Join us

बेवारस बॅगेत सव्वा लाखाचा ऐवज

By admin | Updated: May 9, 2015 23:02 IST

येथील खोपट एसटी स्थानकामध्ये मिळालेल्या बेवारस बॅगेत ११ हजारांच्या रोकडसह सव्वा लाखाचा ऐवज शुक्रवारी दुपारच्या सुमारास मिळाला

ठाणे : येथील खोपट एसटी स्थानकामध्ये मिळालेल्या बेवारस बॅगेत ११ हजारांच्या रोकडसह सव्वा लाखाचा ऐवज शुक्रवारी दुपारच्या सुमारास मिळाला. सुरुवातीला या बॅगेत बॉम्ब असल्याचा संशय व्यक्त होऊन घबराट पसरली होती. मात्र, बॉम्ब-शोधकनाशक पथकाने तिची तपासणी करून तसे काही नसल्याचा निर्वाळा दिला. रात्री उशिरा ज्यांची बॅग होती, ते बाळू हजारे स्थानकात पोहोचले. त्यांनी आपली ओळख पटवून दिल्यानंतर ती त्यांना सुपूर्द करण्यात आली.दुपारी १२ च्या सुमारास बेवारस बॅग खोपट स्थानकात असल्याची माहिती ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. बॅगेत एखादा स्फोटक पदार्थ असल्याच्या शक्यतेने बॅगेपासून सर्व प्रवाशांना दूर करण्यात आले. अर्ध्या तासात ठाणे शहर पोलिसांच्या बॉम्ब-शोधकनाशक (बीडीडीएस) पथकाने स्निफर डॉग राणाच्या मदतीने बॅगची तपासणी करण्यात आली. बॅगेत स्फोटक पदार्थ नसल्याचा इशारा राणाने केल्यानंतर बॅग उघडण्यात आली. त्यामध्ये ११ हजारांची रोकड, चार तोळ्यांचे मंगळसूत्र, एक सोन्याची अंगठी आणि सोन्याच्या साखळ्या आणि काही नवीन कपडे असा सव्वा लाखाचा ऐवज मिळाला. (प्रतिनिधी)