Join us

हेल्मेटसक्तीसाठी दुचाकीस्वारांकडून बंधपत्र

By admin | Updated: January 22, 2015 01:52 IST

राज्याच्या परिवहन विभागाकडून हेल्मेटसक्ती करण्यासाठी दुचाकीस्वारांकडून बंधपत्र लिहून घेण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.

मुंबई : राज्याच्या परिवहन विभागाकडून हेल्मेटसक्ती करण्यासाठी दुचाकीस्वारांकडून बंधपत्र लिहून घेण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. शिकाऊ लायसन्स देतानाच हे बंधपत्र लिहून घेतले जाणार असून, त्याची गुरुवारपासून अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व आरटीओंना देण्यात आले आहेत. विनाहेल्मेट प्रवास करणे हा मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा आहे. अशा बाइकस्वारांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते; तरीही बाइकस्वार नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. पुण्यात तर वाहतूक पोलिसांनी नुकतीच हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याला पुण्यातील जनतेने विरोध केला आणि हेल्मेटसक्ती मागे पडली़ परंतु हेल्मेटबाबत नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत असल्याने परिवहन विभागाने अखेर यावर एक आगळावेगळा उपाय करण्याचा निर्णय घेतला आहे. बाइकस्वारांना लायसन्स देताना हेल्मेटच्या नियमाची आणि त्याचे पालन करण्याची जाणीव त्यांना करून देणे आवश्यक आहे. हे पाहता आरटीओकडून दुचाकीस्वारांना सुरुवातीला शिकाऊ लायसन्स दिली जात असतानाच या नियमाची जाणीव करून देण्यासाठी त्यांच्याकडून बंधपत्र लिहून घेण्याचा निर्णय घेतल्याचे अपर परिवहन आयुक्त सतीश सहस्रबुद्धे यांनी सांगितले. हे बंधपत्र कसे असेल...दुचाकी वाहने चालविताना वाहनचालकाने तसेच त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीने वाहन चालविले जात असताना स्वत:च्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरणे मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १२९ अन्वये बंधनकारक केले आहे. याविषयी मला जाणीव करून देण्यात आली आहे व माझ्या स्वत:च्या तसेच माझ्या मागे बसलेल्या व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी वाहन चालविताना मी सदर तरतुदीचे पालन करीन, अशी मी या बंधपत्राद्वारे हमी देतो. यानंतर लायसन्सधारकाची सही आणि नावही यावर लिहून घेण्यात येईल.