Join us  

प्रेयसीच्या पतीला दहशतवादी ठरविण्यासाठी बॉम्बची अफवा; शालीमार एक्सप्रेस प्रकरणी गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2019 4:23 AM

विक्रोळीच्या तरुणाचा प्रताप : शालीमार एक्स्प्रेस धमकीप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई : प्रेयसीने लग्नानंतर प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिला. पती चांगला आहे. त्याला सोडून येऊ शकत नाही, असे तिने सांगितल्याने प्रियकराने तिच्या पतीलाच दहशतवादी ठरविण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे आलेल्या शालीमार एक्स्प्रेसमध्ये बॉम्बसदृश्य वस्तूसह धमकीचे पत्र ठेवल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी विक्रोळीच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करीत, त्याला पकडण्यासाठी तपास पथक मुंबईबाहेर रवाना केले आहे.

विक्रोळी परिसरातच राहणाऱ्या या तरुणाचे तरुणीसोबत अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, काही कारणास्तव त्यांचा विवाह झाला नाही. तरुणीने घरच्यांच्या संमतीने तेथीलच एका तरुणासोबत विवाह केला. लग्नाला तीन वर्षे झाली असतानाही प्रियकराने तिच्याकडे पतीला सोडून सोबत येण्याचा हट्ट धरला. तिने नकार दिल्याने त्याने सुरुवातीला दोघांचे अश्लील व्हिडीओ, फोटो तिच्या पतीला शेअर केले. मात्र, पत्नीची बदनामी नको म्हणून त्यांनी पोलिसांत तक्रार दिली नाही.

पत्नीनेही प्रियकरासोबत जाण्यास नकार दिल्याने पती तिच्या बाजूने उभा होता. प्रेयसीकडून वारंवार पती चांगला आहे. त्याला सोडून मी राहू शकत नाही, असे उत्तर प्रियकराला मिळत होते. त्यामुळे त्याने, तिच्या पतीलाच दहशतवादी ठरवून त्याला अटक होताच प्रेयसीसोबत संसार थाटायचे स्वप्न रंगवले होते.

त्यासाठी त्याने कटाचे पूर्वनियोजन केले. त्यानुसार लोकमान्य टिळक टर्मिनस येथे बुधवारी आलेल्या शालीमार एक्स्प्रेसमध्ये फटाके, त्यासोबत वायर ठेवून बॉम्बसदृश्य वस्तू असल्याचे दर्शवले. त्यासोबतच धमकीचे पत्र लिहून त्यापुढे प्रेयसीच्या पतीचा मोबाइल क्रमांक लिहून ठेवला.

मोबाइल क्रमांकामुळे उलगडाप्रियकराने लिहून ठेवलेल्या मोबाइल क्रमांकावरून टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. मोबाइलवर संपर्क साधून पोलीस त्याच्या माजी प्रेयसीच्या पतीपर्यंत पोहोचले. त्याच्या चौकशीअंती घडलेले हे सर्व प्रकरण समोर आले.

तपास पथक मुंबईबाहेरआरोपी गावी गेल्याची माहिती मिळताच तपास पथक त्याला पकडण्यासाठी मुंबईबाहेर रवाना झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १६४ अंतर्गत, भादंवि २८५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.