Join us  

मुंबईकरांची पहिल्या दिवशी नाइटलाइफकडे पाठ; वीकेंडला चांगला प्रतिसाद मिळेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 2:47 AM

मुंबईत रविवारी रात्रीपासून नाइटलाइफ सुरू झाली.

मुंबई : मुंबईत नाइटलाइफसंकल्पना राबविली जात आहे. त्याची सुरुवात २६ जानेवारीच्या रात्रीपासून झाली, पण पहिल्या दिवशी याला अल्प प्रतिसाद पाहायला मिळाला. अनेक मॉल आणि हॉटेल रात्री ३ वाजता बंद झाले. काही ठिकाणी तर रात्री १२ नंतरच आॅर्डर घेणे बंद करण्यात आले होते. अनेक मॉल चालकांनी अद्याप निर्णय घेतलाच नाही. दरम्यान, वीकेंडला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा हॉटेल आणि मॉलचालकांनी व्यक्त केली आहे.मुंबईत रविवारी रात्रीपासून नाइटलाइफ सुरू झाली. यामध्ये मॉल, हॉटेल्स, थिएटर्स २४ तास चालू राहणार आहेत. त्यामुळे मध्यरात्री शॉपिंग आणि जेवण करता येईल, परंतु नाइटलाइफमध्ये पब आणि बारचा समावेश नाही. पब आणि बार यांना रात्री दीड वाजेपर्यंतच मद्यविक्रीची परवानगी असून, यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही.मुंबईतील रेस्टॉरंटप्रमाणे मोठे मॉलसुद्धा चालू ठेवले जाणार आहेत. मात्र, प्रत्यक्षात लोअर परेलमधील प्रसिद्ध फिनिक्स मॉलमधील ३०० दुकानांपैकी फक्त ३ ते ४ दुकाने रात्री ३ वाजेपर्यंतच सुरू होती. नरिमन पॉइंट परिसरात सर्व रेस्टॉरंट बंद होते, तर दक्षिण मुंबईतील सीआर २ मॉलमधील खाद्यगृह बंद करण्यात आले होते. वरळी येथील एट्रिया, लोअर परळमधील फिनिक्स मार्केट सिटी आणि कुर्ला येथील फिनिक्स मॉल रात्री तीन वाजेपर्यंत सुरू होते.नाइटलाइफ सुरू झाले असले, तरी त्यासाठी लागणारा खर्च, मनुष्यबळ आणि इतके सगळे करूनही ग्राहकांचा प्रतिसाद, याबाबत मॉल चालकांना शंका आहे. कित्येक मॉलचालकांनी रात्रभर मॉल सुरू ठेवण्याबाबत अद्याप निर्णय घेतला नाही, तर काही मॉल चालक नेहमीपेक्षा काही तास जास्त खाद्यगृह सुरू ठेवण्याच्या विचारात आहेत.आम्ही २४ तास मॉल सुरू ठेवण्याचा अद्याप निर्णय घेतला नाही, पण खाद्यगृह पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू ठेवणार आहोत, तेही वीकेंडला. जेणेकरून लोकांना खरेदीपेक्षा खानपान करणे सोपे होईल, असे इन्फिनिटी मॉलचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश कुमार यांनी सांगितले. तर इनॉर्बिट मॉलचे मुख्य कार्यकारी अधिकारी रंजीश महाजन म्हणाले की, मॉल २४ तास सुरू असले, तरी आम्ही अद्याप या संदर्भात निर्णय घेतलेला नाही.एका दिवसात अंदाज लावणे अशक्यनाइटलाइफसाठी हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांची तयारी झालेली नाही. एखाद्या सणाला रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवायची असतील, तर ठीक आहे, पण दररोज ठेवायची म्हणजे त्या प्रमाणात मनुष्यबळ वाढवावे लागेल. एका रेस्टॉरंटमध्ये पाच ते दहा जणांची एक शिफ्ट जास्त करावी लागेल. काल रेस्टॉरंट रात्री १.३० किंवा त्यापूर्वीच बंद झाले. एका दिवसात अंदाज लावता येणार नाही. वीकेंडला चांगला प्रतिसाद मिळू शकतो.- शिवानंद शेट्टी, अध्यक्ष, आहार संघटना.

टॅग्स :नाईटलाईफ