बोईसर : बोईसर व तारापूर पोलीस स्थानक क्षेत्रात सार्वजनिक व घरगुती असे दोन्ही मिळून सुमारे दीड हजार गणरायांचे आगमन होणार आहे. गणेशोत्सवाच्या स्वागताची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. बोईसरला आठ तर तारापूर येथे दोन गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ मांडले जाणार असून सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदोबस्ताकरिता अतिरिक्त पोलीस व होमगार्डही तैनात केले जाणार आहेत.बोईसर पोलीस स्थानक क्षेत्रात सार्वजनिक १५३ तर घरगुती ९३५ तर तारापूर पोलीस स्थानक क्षेत्रात ७६ सार्वजनिक व २२७ घरगुती गणेशोत्सव साजरे होणार आहेत. बोईसरला महागाव, मान, हनुमान नगर, कोलवडे, कुंभवली, खानिवडे, गारगाव व शिगाव तर तारापूर येथे अक्करपट्टी व पोफरण अशा एकूण दहा गावांत एक गाव एक गणपती अशा संकल्पनेचा गणेशोत्सव आहे. बोईसर पोलीस स्थानक क्षेत्रात एक पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्यासह एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, पाच पोलीस उपनिरीक्षक तर ७० पोलीस कर्मचारी तर तारापूर पोलीस स्थानक क्षेत्रात एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पीएसआय, तीस पोलीस कर्मचारी उपलब्ध असून सुमारे साठ अतिरिक्त पोलीस व होमगार्डही बंदोबस्तासाठी उपलब्ध होणार आहेत.उद्या गणपती घरी आणण्यासाठी रस्त्यावर एकत्र गर्दी होईल, म्हणून आज दिवसभरात गणपती वाजत गाजत आणण्याचे काम सुरू होते, तर अत्यंक धार्मिक भावनेने गणेशाचे स्वागत करण्यात आले. उद्या त्याची विधीवत पूजा होणार असून नागरिक आनंद साजरा करणार आहेत. सगळीकडेच उत्साह आहे. (वार्ताहर)
बोईसरला आठ ठिकाणी ‘एक गाव-एक गणपती’
By admin | Updated: August 29, 2014 00:21 IST