बोईसर : बोईसर ते तारापूर या मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यांना बोईसर ग्रामपंचायतीने पोलिसांच्या मदतीने हटविल्याने नागरिक सुखावले मात्र फेरीवाले या मोहिमेमुळे दुखावले आहेत. तर फेरीवाल्यांना हटविल्यानंतर रस्ता मोकळा झाल्याने नागरिकांनी मोहिमेचे स्वागत केले आहे. तारापूर अणुउर्जा केंद्र, भाभा अणुसंशोधन केंद्र व तारापूर एमआयडीसी या तिन्ही महत्वाच्या प्रकल्पाकडे बोईसर रेल्वे स्थानकावरून जाणारा बोईसर तारापूर हा मुख्य व महत्वाचा रस्ता असून याच रस्त्यावरील चित्रालय ते बोईसर पर्यंतच्या भागामध्ये महत्वाची रुग्णालये, आर्थिक संस्था, व्यापारी बाजारपेठ तसेच परिसरातील असंख्य संस्था, व्यापारी बाजारपेठ तसेच परिसरातील असंख्य गावांमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या डेपो व सहा आसनी रिक्षा स्टँड असल्याने नेहमीच वर्दळ असते. रस्त्याच्याकडेला भाजीपाला, फुलफळ विक्रेते व इतर अनेक विक्रेत्यांनी व्यापल्याने खरेदीदारांबरोबरच त्यांची वाहनेही रस्त्यावर उभी राहू लागल्याने मुळातच वाहतूकीस कमी पडणाऱ्या रस्त्यावर गर्दी उसळून वाहतुकीची प्रचंड कोंडी होत होती. होणारा खोळंबा व पादचाऱ्यांना सहन करावा लागणारा त्रास तेथे होणारे छोटे मोठे अपघात यामुळे बोईसर ग्रामपंचायतीने काही महिन्यापूर्वी फेरीवाल्यांना हटविले होते. परंतु पुन्हा त्यांनी बस्तान मांडल्याने बोईसर ग्रामपंचायतीने फेरीवाला हटाव मोहीम मागील चारपाच दिवसापासून हाती घेतली आहे. याच रस्त्यावर शुक्रवारी आठवड्याचा बाजार ही प्रचंड मोठ्या प्रमाणात भरत असून शुक्रवारचा बाजार व फेरीवाल्यांना हटविण्यासाठी बोईसर ग्रामपंचायतीमध्ये अनेक वेळा प्रश्न चर्चिला गेला हाता तर काही वर्षापूर्वी मनसेने शुक्रवारचा बाजार आंदोलन करून भरू दिला नव्हता. त्यावेळी शिवसेनेने शिवमंदिर ते एचडीएफसी बँकेपर्यंत बसणारे फेरीवाले हे परिसरातील स्थानिक महिला व छोटी छोटी जागा व्यापून बसणारे असल्याने त्यांना बसू द्यावे ही आग्रहाची मागणी केली होती. परंतु आता फेरीवाल्यांनी स्टेट बँक हार्मोनी पासून विजयनगर, सिडको पर्यंतचा रस्ता व्यापल्याने रस्त्यावरील गर्दी वाढत आहे तर फेरीवाल्यांना हटविल्यानंतर आशिष संखे यांनी शनिवारी पालकमंत्री विष्णू सवरा यांची बोईसरला फेरीवाल्यांची भेट घडवून आणून फेरीवाल्यांवर अन्याय झाल्याचे सांगून त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली. तसेच पोलिसांनी लाठीमार केल्याची तक्रार पालकमंत्र्यांकडे करण्यात आली. मात्र तेथे भाजपाच्या कार्यक्रमात आलेल्या पदाधिकाऱ्यांना व नेत्यांना विचारले असता वाहतुकीचा होणारा खोळंबा पाहता रस्ता मोकळा राहणे ही गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
बोईसरमध्ये फेरीवाल्यांना हटविले
By admin | Updated: March 29, 2015 22:42 IST