लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : खुनाची धमकी देऊन उद्योजकांंकडून सहा लाखांची खंडणी उकळणाऱ्या त्र्यंबक पटेकर (२५, रा. अंबिकानगर, ठाणे), सोमनाथ दाभाडे (३५, रा. जयभवानीनगर, ठाणे) आणि शरद मोहतेकर (४०, चितळसर, ठाणे) या तिघांना वागळे इस्टेट पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यांना ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
वागळे इस्टेट येथील औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचे प्रकार काही जणांकडून सुरू आहेत. यासंदर्भातील काही तक्रारी उद्योजकांच्या ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असोसिएशन (टिसा) या संघटनेकडे आल्या होत्या. त्याच अनुषंगाने एका उद्योजकाने दिलेल्या तक्रारीनुसार पटेकर याच्यासह तिघांनी मिळून जानेवारी २०२० ते २९ नोव्हेंबर २०२० रोजी पहाटे १.४५ वाजण्याच्या दरम्यान त्यांना एमआयडीसीतील जागेच्या विक्री व्यवहारामध्ये कोणताही अडथळा होऊ नये, यासाठी त्यांनी सांगितलेल्या व्यक्तीबरोबरच व्यवहार करण्याची धमकी दिली. त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे ३५ लाखांच्या खंडणीचीही मागणी केली. ही रक्कम दिली नाही, तर ठार मारण्याचीही त्यांना धमकी दिली. त्यामुळे जागेच्या व्यवहारामध्ये कोणताही अडथळा येऊ नये तसेच त्यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून भीतीपोटी या तिघांनाही २७ मार्च २०२० रोजी चार लाख रुपये तसेच १४ सप्टेंबर रोजी दोन लाख रुपये अशी सहा लाखांची रक्कम या उद्योजकाने दिली. त्यानंतरही जागेच्या हस्तांतरण व्यवहारामध्ये त्यांनी या उद्योजकाकडे आणखी ६० लाखांच्या खंडणीची मागणी केली. ती दिली नाही, तर त्यांना पुन्हा धमकी दिली. अखेर, या प्रकाराला कंटाळून या उद्योजकाने २ डिसेंबर रोजी या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध खंडणीची तक्रार दाखल केली. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे आणि रवींद्र फड आदींच्या पथकाने या तिघांनाही २ डिसेंबर रोजी अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे हे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.