Join us

बोगस प्रमाणपत्रांना आळा बसणार

By admin | Updated: April 2, 2017 00:10 IST

गेल्या १६ महिन्यांपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेला डिजिटल लॉकर शनिवारी पूर्णत: कार्यरत झाला असून, यापुढे विद्यापीठात पेपरलेस कामकाज सुरू होणार आहे

मुंबई : गेल्या १६ महिन्यांपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेला डिजिटल लॉकर शनिवारी पूर्णत: कार्यरत झाला असून, यापुढे विद्यापीठात पेपरलेस कामकाज सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना आता त्यांची प्रमाणपत्र आॅनलाइन मिळणार असून, प्रमाणपत्र पडताळणीदेखील आॅनलाइन होणार आहे. त्यामुळे आता बोगस प्रमाणपात्रांना आळा घालणे सहज शक्य होणार असून, पडताळणीचा वेळ कमी होणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले.१६० व्या पदवीप्रदान समारंभात पहिला डिजिटल लॉकर हा मुकेश अंबानी यांचा काढण्यात आला होता. त्यानंतर, आता ही सेवा नियमितपणे सुरू करण्यात आली आहे. जूनमध्ये विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे डिजिटल लॉकर काढण्यात येणार आहेत. पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका आता पूर्णत: डिजिटल होणार आहेत. अनेकदा पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका पडताळणीसाठी अधिक काळ लागतो, पण आता डिजिटलमुळे हा वेळ ८० टक्के कमी होणार आहे. डिजिटल लॉकरसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला एक आयडी आणि पासवर्ड देण्यात येणार आहे. त्याचबरोबर, कोणत्या दिवशी, किती वाजता, कोणत्या अधिकाऱ्याने पडताळणी केली, याचीदेखील नोंद या डिजिटल लॉकरमध्ये ठेवली जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.डिजिटल लॉकरमध्ये फेक प्रमाणपत्र आणि गुणपत्रिकाचा शोध घेणे सहज शक्य होणार आहे. यापुढे जाऊन आता पोलिसांशी बोलणी सुरू आहेत. एखादे फेक प्रमाणपत्र सापडल्यास आॅनलाइन तक्रार दाखल केली जाणार आहे, यावर सध्या काम सुरू आहे. आॅनलाइन पडताळणीमुळे विद्यार्थ्यांच्या खेपा कमी होणार आहेत. याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना होणार असून, आधी पास झालेले विद्यार्थीही स्वत:चा लॉकर सुरू शकणार आहेत. या लॉकरला आधार कार्डशी जोडले जाणार आहे. (प्रतिनिधी)