नवी मुंबई : कोपरखैरणे येथील नाल्यावरील पुलाखाली अज्ञात तरुणीची गळा आवळून तिचा मृतदेह कपड्यामध्ये गुंडाळून टाकण्यात आलेला होता. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.सेक्टर-११ येथील नाल्यावरील पुलाखाली बुधवारी सकाळी हा मृतदेह आढळला. सफेद रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून हा मृतदेह तेथे टाकण्यात आला होता. पुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांमुळे हा प्रकार निदर्शनास आला. त्यामुळे तेथे मोठ्यासंख्येने बघ्यांची गर्दी जमा झालेली. याची माहिती मिळताच कोपरखैरणे व एपीएमसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी २२ ते २५ वर्षे वयाच्या तरुणीचा हा मृतदेह असल्याचे उघड झाले. गळा आवळून हत्या करून तिचा मृतदेह पुलाखाली टाकण्यात आलेला. तसेच तरुणीच्या चेहऱ्यावर देखील जखमा आढळून आल्या आहेत. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या मयत तरुणीची ओळख पटलेली नसून तिच्या कुटुंबीयांचा शोध सुरू असल्याचे सहाय्यक आयुक्त धनराज दायमा यांनी सांगितले. एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासासााठी विशेष पथके तयार केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया मोरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नाल्यात आढळला अज्ञात तरुणीचा मृतदेह
By admin | Updated: February 12, 2015 01:05 IST