मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनसवर एका सुटकेसमध्ये रविवारी एका दहा वर्षांच्या मुलाचा मृतदेह टिळक नगर पोलिसांना आढळून आला होता. ही घटना ताजी असतानाच सोमवारी सकाळी कुर्ल्यातील एका रेशनिंग दुकानात ७ वर्षीय मुलाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. तांदळाच्या गोणीखाली हा मृतदेह मिळाल्याने परिसरात खळबल उडाली असून याबाबत विनोबा भावे नगर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. करण निशाद (७) असे या चिमुरड्याचे नाव असून तो कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगर परिसरात आई-वडीलांसह राहात होता. पहिलीत शिकणारा करण शनिवारी दुपारी बेपत्ता झाला. रात्रीपर्यंत त्याचा शोध घेण्यात आला. मात्र त्याचा थांगपत्ता लागला नाही. परिणामी त्याच्या कुटुंबियांनी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता. दरम्यान सोमवारी सकाळी याच परिसरात असलेल्या शिधावाटप दुकानातून दुर्गंधी येत असल्याने दुकानात काम करणाऱ्या कामगारांनी आत जात पाहणी केली असता एका तांदळाच्या गोणीखाली करणचा मृतदेह त्यांना दिसला. दुकान मालकाने याची माहिती विनोबा भावे नगर पोलिसांनी दिली. त्यानुसार घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविला. मुलाचे वडील याच दुकानात काम करत असल्याने करण या दुकानात कधी-कधी अभ्यास करण्यासाठी येत होता. याच वेळी अंगावर गोणी पडून त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. (प्रतिनिधी)
बेपत्ता मुलाचा मृतदेह रेशन दुकानात आढळला
By admin | Updated: January 10, 2017 04:17 IST