Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयाचा मृतदेह महिनाभर सौदीत

By admin | Updated: June 5, 2015 01:12 IST

व्यवसायासाठी सौदी अरेबीयात असलेल्या भारतीय नागरीकाचा हद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

मनीषा म्हात्रे - मुंबईव्यवसायासाठी सौदी अरेबीयात असलेल्या भारतीय नागरीकाचा हद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही माहिती दुतावासामार्फत मुंबईतल्या कुटुंबियांना कळविणे दूरच पण कागदपत्रांची पूर्तता करूनही गेल्या महिन्याभरापासून मृतदेह मिळविण्यासाठी कुटुंबियांवर वणवण करण्याची पाळी ओढवली आहे. भरीस भर म्हणजे मृतदेह मिळवून देण्याच्या नावाखाली काहींनी या कुटुंबाला लाखो रूपयांचा गंडा घातला. ही व्यथा आहे मुंबईतील विक्रोळी येथे राहणारे रंजनीकांत नागीनदास दलाल या कुटुंबियाची..दलाल कुटुंब विक्रोळीच्या टागोर नगर परिसरातील सुयोग इमारतीत राहाते. घरातील कर्ता आधार रजनीकांत (६८), पत्नी रेखा(६०) मुलगी खयाती(२४)आणि मुलगा देवांग(२०) असे त्यांचे छोटेसे कुटुंब. रंजनीकांत हे गेल्या ३० वर्षांपासून सौदी अरेबियातील अल-कॉसीम बुरेखा परिसरातील एका गॅरेजमध्ये आॅटो इलेक्ट्रिीशिअन म्हणून काम करतात. पत्नी गृहीणी तर दोन्हीही मुले शिक्षण घेत आहेत. अशात घरचा भार ते एकटे पेलत होते. दोन ते तीन वर्षातून एकदा सहा महिन्याच्या सुट्टीवर घरी कुटुंबियांच्या भेटीसाठी यायचे. नित्यनियमाने ते कामातून वेळ काढून कुटुंबियांशी संवाद साधत होते. २६ एप्रिल रोजी रंजनीकांत यांचा कॉल आला. तो त्यांचा अखेरचा कॉल ठरला. सलग दोन दिवस त्यांचा फोन बंद लागल्याने दलाल कुटुंबियांच्या मनात चिंतेची पाल चुकचूकली. २९ एप्रिल रोजी त्यांंच्या मोबाईलवरुन फोन आला. तो कॉल त्यांच्या मित्राचा होता. दलाल यांंना ह्रदय विकाराचा झटका आल्याने ते स्थानिक रुग्णालयात व्हेंटीलेटरवर असल्याचे सांगितले. काही वेळाने पुन्हा घरातला फोन खणखणला. तो त्यांच्या निधनाची माहिती देणारा होता. याचा धक्का पत्नीला बसला आणि त्या जमीनीवर कोसळल्या. आई शुद्धधीवर आल्यानंतर बाबाच्या निधनाचे वृत्त त्यांना समजले. आणि दलाल कुटुंबियांवर शोककळा पसरली.एकीकडे नियमांप्रमाणे तेथील दुतावासाकडून दलाल यांच्या निधनाची बातमी पोहचणे गरजेचे होते. मात्र माहिती मिळणे तर दुरच सर्व कागदपत्राची पूर्तता केली असतानाही गेल्या महिन्याभरापासून त्यांना वडिलांच्या मृतदेहासाठी वणवण करावी लागत आहे. त्यातच दुतावास आणि दलाल कुटुंबियांमध्ये मध्यस्थी करणाऱ्यांनी मृतदेह भारतात आणतो असे सांगून अडीच लाख रूपये उकळून पोबारा केला, अशी माहिती दलाल कुटुंबियांनी लोकमतला दिली. प्रशासनाने वेळीच याची दखल घेऊन दलाल यांचा मतदेह ताब्यात दिला नाही तर आम्ही सामुहिकरित्या आत्महत्या करू, अशी भुमिका दलाल कुटुंबियांनी घेतली आहे.