Join us  

अभ्यास मंडळानी अधिकाधिक संदर्भ पुस्तके तयार करावीत - राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 12:48 AM

जवळपास दीड वर्षापूर्वी प्राणिशास्त्र अभ्यास मंडळाने तयार केलेल्या ५०व्या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते तर आज शंभराव्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र अभ्यास मंडळाने तयार केलेल्या १०० व्या व विद्यापीठाने स्वत: प्रकाशित केलेल्या ‘टेक्सोनॉमी आॅफ कॉरडेट्स’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी महाराष्ट्राचे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले. प्राणिशास्त्र विषयातील शंभराव्या पुस्तकाचे प्रकाशन करताना आनंद होत असून आगामी काळात विद्यापीठाच्या इतरही अभ्यास मंडळांनी संदर्भ पुस्तके तयार करावीत. आॅक्सफर्ड विद्यापीठ प्रेसप्रमाणे मुंबई विद्यापीठानेही गुणवत्तापूर्ण आणि माफक दरात पुस्तके प्रसिद्ध करावीत, अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.जवळपास दीड वर्षापूर्वी प्राणिशास्त्र अभ्यास मंडळाने तयार केलेल्या ५०व्या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते तर आज शंभराव्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. त्यामुळेच पुढील दोन वर्षांत या अभ्यास मंडळाने पुस्तक तयार करण्याचे द्विशतक गाठावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी या वेळी व्यक्त केली. प्राणिशास्त्र अभ्यास मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष प्रा. विनायक दळवी यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा प्रकल्प आहे. डॉ. जी. बी. राजे, डॉ. दिलीप भारमल, डॉ. एम. एन. जांबळे, एस. एस. वाघमोडे आणि डॉ. एच. टी. बाबर यांनी तृतीय वर्ष बीएस्सी प्राणिशास्त्र विषयासाठी टेक्सोनॉमी आॅफ कॉरडेट्स या पुस्तकाचे लेखन केले आहे. अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक तयार करून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडेल एवढ्या कमी किमतीत अशी पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची किमया प्रा. विनायक दळवी यांनी साधली असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी या वेळी सांगितले.

टॅग्स :भगत सिंह कोश्यारी