Join us  

गोखले पुलासाठी महापालिका तयार करणार आराखडा; ‘व्हीजेटीआय’च्या सूचना ठरणार मार्गदर्शक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 10:06 AM

अंधेरीतील गोखले पूल आणि सी. डी. बर्फीवाला पुलातील उंचीची तफावत दूर करण्यासाठी पूल पाडण्याची गरज नाही.

मुंबई :अंधेरीतील गोखले पूल आणि सी. डी. बर्फीवाला पुलातील उंचीची तफावत दूर करण्यासाठी पूल पाडण्याची गरज नाही. जॅक या विशेष अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या आधारे पुलाचा स्लॅब उंचावता येऊ शकतो, अशी महत्त्वपूर्ण शिफारसीचा १५ पानी अहवाल व्हीजेटीआयने मुंबई पालिकेला दिला आहे. त्यानुसार पालिकेने आता स्वतःचा आराखाडा तयार करण्यास सुरुवात केली आहे. व्हीजेटीआयच्या कोणत्या शिफारशीची अंमलबजावणी करायची? कोणते तंत्रज्ञान वापरावे? नवीन निविदा प्रक्रिया राबवावी की जुन्या कंत्राटदाराकडून काम करून घ्यावे आदी सूचना पालिकेसाठी मार्गदर्शक ठरणार आहेत. 

अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाच्या कामांत एवढी मोठी चूक पालिकेवर टीकेची झोड उठली. त्यानंतर प्रशासनाने सारवासारव करत व्हीजेटीआयला साद घातली. व्हीजेटीआयच्या अहवालानुसार जॅक व विशेष अभियांत्रिकी तंत्राचा वापर करून पुलाचे स्लॅब उंचावला जाऊ शकतात. बर्फीवाला पुलाचे स्लॅब उंच करण्यासाठी एक पद्धत प्रस्तावित केली असून, जॅकचा वापर करून पुलाला गोखले पुलाशी जोडता येईल. पुलाचे स्तंभ खालून वर करणे शक्य आहे. पातळी जोडण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरता येईल, त्याबाबत या अहवालात माहिती दिली आहे. 

सूचना का आवश्यक? 

१) बर्फीवाला उड्डाणपूल हा गोपाळ कृष्ण गोखले पुलासोबत जोडण्यासाठी सद्यस्थितीला स्वामी विवेकानंद मार्ग आणि जुहू येथून अंधेरी स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या मार्ग येथे दुरुस्ती किंवा अद्ययावतीकरणाच्या कामासाठी अतिरिक्त जागेची आवश्यकता आहे. 

२) गोखले पुलाच्या कामासोबतच जोडणीचे काम हाती घेतल्यास हे दोन्ही मार्ग बंद करावे लागतील. परिणामी स्वामी विवेकानंद मार्ग आणि बर्फीवाला मार्ग येथे वाहतुकीचा खोळंबा निर्माण होण्याची शक्यता आहे. 

३) दुसऱ्या टप्प्यातील कामासोबतच दोन्ही पुलांच्या जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. व्हीजेटीआयने सुचवलेल्या कार्यपद्धतीनुसार हे काम केले जाणार आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकाअंधेरी