Join us  

‘मलबार हिल’च्या मदतीला आयआयटी; रूरकी संस्था करणार पुनर्बांधणी संदर्भात पुन्हा अभ्यास 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2024 10:18 AM

मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा वाद चिघळत असल्याने मुंबई महापालिकेने आता यासाठी ‘आयआयटी रूरकी’ या संस्थेची मदत घेण्याचे ठरविले आहे.

मुंबई : मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा वाद चिघळत असल्याने मुंबई महापालिकेने आता यासाठी ‘आयआयटी रूरकी’ या संस्थेची मदत घेण्याचे ठरविले आहे. या संस्थेतील तज्ज्ञ मलबार हिल जलाशयाची पाहणी करतील, तसेच या आधीच्या सूचना आणि अहवालांचा अभ्यास करून आपले मत मांडतील. त्यानुसार पुढे मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीवर तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. 

मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी किंवा दुरुस्तीसंदर्भात बहुप्रतीक्षित असा अंतिम अहवाल ५ मार्च रोजी ‘आयआयटी’च्या तज्ज्ञांनी सादर केला. मात्र, आठ सदस्यांच्या समितीत दोन वेगवेगळे अहवाल दिल्यामुळे या विषयावरील गुंता अद्याप कायम आहे. ‘आयआयटी’च्या सदस्यांनी पर्यायी जलाशय बांधून, मग सध्याचे जलाशय रिकामे करून त्याची संरचनात्मक तपासणी आणि दुरुस्ती करण्याची शिफारस केली आहे. 

मात्र, अन्य चार सदस्यांना ही शिफारस मान्य नसल्यामुळे अंतिम अहवालानंतरही या विषयाचा गुंता कायम असून, यावर अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान, आता पालिका प्रशासनाकडून आणखी काही तज्ज्ञांचा सल्ला याप्रश्नी घेतला जाणार असून, त्यासाठी ‘आयआयटी रूरकी’ची मदत घेतली जाणार आहे. 

प्रश्नांवर तोडगा काढून मगच निर्णय -

१)  मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीच्या वेळेस आधीच्या अहवालात सुचविल्याप्रमाणे आधी दुसऱ्या ठिकाणी नवीन जलाशयाची टाकी बंधणे शक्य आहे का, त्याचा कसा आणि किती उपयोग करता येईल, दरम्यान मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर काही परिणाम होईल का? या सगळ्या बाबींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. 

२)  याआधी ज्या तज्ज्ञांनी या संदर्भात मार्गदर्शन केले आहे, अशा तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे पालिकेने ठरविले आहे. याशिवाय मलबार हिल जलाशयाची अंतर्गत दुरुस्ती जरी टप्प्याटप्प्याने करायची झाली, तरी ती किती काळ टिकेल, याचाही विचार करायला हवा. 

३)  या सगळ्यावर तोडगा काढण्यासाठी पालिका आता आयआयटी ‘रूरकी’ची मदत घेणार असून, त्यानंतर पुढील निर्णय होईल.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामलबार हिल