Join us  

हंटिंग्टन आजाराबद्दलच्या जनजागृतीसाठी महापालिका मुख्यालयावर निळ्या, जांभळी रोषणाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 11:17 PM

आंतरराष्ट्रीय स्तरावर हंटिंग्टन डिसीज जागरूकता महिना ज्याप्रमाणे साजरा करण्यात येतो, त्याचप्रमाणे हंटिंग्टन डिसीज सोसायटी ऑफ इंडिया यांनी देखील मे महिना हा ‘हंटिंग्टन आजार जागरूकता महिना’ म्हणून पाळण्याचे ठरविले आहे.

मुंबई: मेंदूवर परिणाम करणाऱ्या हंटिंग्टन आजाराविषयी जनजागृती व्हावी, यासाठी हंटिंग्टन डिसीज सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने निरनिराळे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेच्या विनंतीनुसार महानगरपालिका मुख्यालयावर विशिष्ट निळ्या व जांभळ्या रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली. 

हंटिंग्टन आजार ही असाध्य अनुवांशिक स्थिती आहे. आजारामुळे मेंदूवर परिणाम होतो. रुग्णांचे शारीरिक हालचालींवर नियंत्रण नसणे, व्यक्तिमत्वातील असाधारण बदल आणि अपुरी आकलन क्षमता अशाप्रकारची लक्षणे आढळून येतात. आजाराने ग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी ‘हंटिंग्टन डिसीज सोसायटी ऑफ इंडिया’ ची स्थापना करण्यात आली आहे. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर हंटिंग्टन डिसीज जागरूकता महिना ज्याप्रमाणे साजरा करण्यात येतो, त्याचप्रमाणे हंटिंग्टन डिसीज सोसायटी ऑफ इंडिया यांनी देखील मे महिना हा ‘हंटिंग्टन आजार जागरूकता महिना’ म्हणून पाळण्याचे ठरविले आहे. यामध्ये ‘लाईट इट अप फॉर एचडी’ नावाचा महत्वाचा उपक्रम समाविष्ट आहे. हंटिंग्टन आजाराने बाधित रुग्णांच्या कुटुंबासोबत आपले दृढ ऐक्य दर्शविण्यासाठी रोषणाई करण्यात आली.

दरम्यान, चर्चगेट रेल्वे स्थानकावर १२ मे, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस इमारतीवर १२ मे, वांद्रे वरळी सागरी सेतूवर १४ मे, ठाणे महानगरपालिका मुख्यालयावर १६ मे आणि नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर १८ मे रोजी याप्रमाणे त्या-त्या दिवशी रात्री ८ वाजता विशिष्ट रंगाची विद्युत रोषणाई केली जाणार आहे, अशी माहिती हंटिंग्टन डिसीज सोसायटी ऑफ इंडियाने दिली.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका