Join us  

दूषित पाणीपुरवठा रोखण्यासाठी उपाययोजना सुरू; मुख्य जलाभियंत्यांनी दिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 11:18 AM

दूषित पाणीपुरवठ्याचे वृत्त लोकमतमध्ये बुधवारी प्रसिद्ध झाले होते. याची तातडीने दखल घेण्यात आली.

मुंबई :विक्रोळी कन्नमवार नगरमध्ये होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याची गंभीर दखल महानगरपालिका प्रशासनाने घेतली असून, गुरुवारी खुद्द जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे विक्रोळीत आले. त्यानंतर दूषित पाण्याचा शोध घेण्याची मोहीम तातडीने हाती घेण्यात आली. दूषित पाणीपुरवठ्याचे वृत्त लोकमतमध्ये बुधवारी प्रसिद्ध झाले होते. याची तातडीने दखल घेण्यात आली.

माळवदे यांनी परिसराची पाहणी केली. या भागात अस्तित्त्वात असलेले जलवाहिनीचे जाळे हे म्हाडाच्या मालकीचे असून, त्याचे प्रचलन व परिरक्षण ‘म्हाडा’द्वारे केले जाते. असे असले, तरी  पालिकेने स्वत: दूषित पाणीपुरवठ्याची जागा शोधण्याची कार्यवाही हाती घेतली आहे. जलवाहिनीतील गळती, दूषित स्रोत शोधण्यासाठी अत्याधुनिक क्राऊलर कॅमेऱ्याचा वापर केला जात आहे. फुटलेली मलनिस्सारण  वाहिनी दुरुस्तीसाठी मलनिस्सारण खात्यालादेखील कार्यवाही करण्यासाठी कळविण्यात आले आहे.

‘म्हाडा’ने आपल्या अखत्यारितील या क्षेत्रात आवश्यक उपाययोजना करून निराकरण करावे, असे पालिकेकडून ‘म्हाडा’ला सांगण्यात आले. मात्र, ‘म्हाडा’कडून तत्काळ प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेनेच पाणी गळतीच्या नेमक्या ठिकाणाचा शोध घेण्याचे काम हाती घेतले आहे. जलवाहिनीतील गळती, दूषित स्रोत शोधण्यासाठी अत्याधुनिक क्राऊलर कॅमेऱ्याचा वापर करण्यात येत आहे. मलनिस्सारण  वाहिन्यांमधून गळती होऊन पाणी वाहताना आढळल्याने मलनिस्सारण वाहिनी यंत्रणेला देखील त्यांच्या अखत्यारितील दुरुस्ती तत्काळ करण्यासाठी कळवले. त्यानुसार ती कामे देखील हाती घेतली आहेत.

पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले-

इमारत क्रमांक ६, ७, ८, १२, १८ मध्ये एकूण ५०० घरे आणि २,६५८ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी ३ नागरिकांना मळमळ आणि उलट्या यांसारख्या समस्या आढळल्या. क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालय आणि ७ खासगी दवाखान्यांत आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी भेट दिली. जलजन्य संसर्ग रुग्णांची वाढ आढळून आलेली नाही, असे स्पष्ट करण्यात येत आहे. दूषित पाणीपुरवठा होत असलेल्या इमारतीतील पाण्याचे नमुने घेण्यात आले असून प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाविक्रोळी