Join us  

सण, उत्सवांसाठी पालिकेने उघडली परवानग्यांची ‘खिडकी', मार्गदर्शक सूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 9:49 AM

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य.

मुंबई : गणेशोत्सव हा खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक व्हावा, या उद्देशाने यंदा ही पालिकेकडून गणेश मूर्तिकारांना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार मोफत शाडूची माती, मंडपासाठी नि:शुल्क जागा देण्यात येणार आहे. मूर्तिकारांना गणेशोत्सवासाठीची परवानगी नवरात्रोत्सवापर्यंत कायम राहणार असल्याने त्यांना पुन्हा परवानगीची आवश्यकता असणार नाही. 

या पालिकेकडून विविध प्रकारच्या परवानग्या मूर्तिकारांना एकाच ठिकाणी मिळाव्यात, यासाठी ‘एक खिडकी योजना’ देखील राबविण्यात येणार आहे.

मंडप परवानगीची प्रक्रिया सुटसुटीतमूर्तीकारांनी मंडपाकरिता अर्ज सादर करतांना मागील सलग तीन वर्षांच्या परवानगीच्या प्रती अर्जासोबत जोडणे बंधनकारक करण्यात आले यंदाच्या गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना पालिकेच्या वतीने जारी करण्यात आल्याची माहिती परिमंडळ २चे उपायुक्त आणि गणेशोत्सवाचे समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी दिली. सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीत जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी, के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त मनिष वळंजू, एन विभागाचे सहायक आयुक्त गजानन बेल्हाळे यांचा समावेश आहे. 

मंडपासाठी शुल्क नाही-

१) पालिकेच्या मालकीच्या जागेवरील मंडपासाठी, खासगी जमीन मालकाच्या परवानगीने उभारण्याच्या मंडपासाठी यंदा कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 

२) प्रत्येक मंडपासाठी देखील अनामत रक्कम आकारली जाणार नाही. परंतु खासगी जागेवर मंडपासाठी परवानगी मागणारे मूर्तिकार हे पारंपरिक मूर्तिकार असणे अनिवार्य आहे.

३) अशा मूर्तिकारांना शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांपैकी कोणत्याही एकाच ठिकाणी परवानगी घेता येईल. 

अर्जदार मूर्तिकार असावा-

पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी उपलब्ध असलेली जागा ‘प्रथम अर्जदारास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी अर्जदार स्वत: मूर्तिकार असणे अनिवार्य आहे. 

‘ना-हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक-

१) मूर्तिकारांनी मंडपाकरिता अर्ज सादर करताना मागील सलग तीन वर्षांच्या परवानगीच्या प्रती अर्जासोबत जोडणे बंधनकारक करण्यात आले असून, त्यानंतरच मंडपासाठी परवानगी देण्यात येईल, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

२) ज्यांच्याकडे सलग तीन वर्षांच्या परवानगी असतील त्यांना नव्याने पोलिस व वाहतूक विभाग यांच्या ना-हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. मागील तीन वर्षांपैकी एक परवानगी नसल्यास मूर्तिकारांना पोलिस, वाहतूक विभागाचे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ सादर करणे बंधनकारक असेल. 

टॅग्स :मुंबईनगर पालिकागणेशोत्सव