Join us

बीएमसी अभियंत्यांचे आजपासून काम बंद

By admin | Updated: October 7, 2016 06:17 IST

स्ते विभागाचे मुख्य अभियंता संजय दराडे यांना खड्डेप्रकरणी रस्त्यावर उभे करून मनसेने अभियंत्यांचा रोष ओढावून घेतला आहे. या घटनेच्या निषेधार्थ

मुंबई : रस्ते विभागाचे मुख्य अभियंता संजय दराडे यांना खड्डेप्रकरणी रस्त्यावर उभे करून मनसेने अभियंत्यांचा रोष ओढावून घेतला आहे. या घटनेच्या निषेधार्थ अभियंत्यांनी शुक्रवार ७ आॅक्टोबरपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. मनसेही भूमिकेवर ठाम असल्याने हा वाद चिघळणार आहे. या आंदोलनामुळे अत्यावशक सेवा ठप्प होण्याची चिन्हे आहेत.

मुंबईतील खड्डे आगामी निवडणुकीत ज्वलंत मुद्दा ठरणार आहेत. संधीसाधू मनसेने खड्ड्यांचे आंदोलन छेडले आहे. मात्र यासाठी त्यांनी मुख्य अभियंत्यांना जबाबदार धरून त्यांना दादर येथील केळकर मार्गावर फलक घेऊन उभे केले. त्यावर ‘मी या खड्ड्यांना जबाबदार आहे...’ असे लिहिले होते. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या दराडे यांनी राजीनामा देण्याची तयारी केली. परिणामी सर्व अभियंत्यांनीही गुरुवारी महापालिका मुख्यालय गाठले. सुमारे तीन हजार अभियंत्यांनी आयुक्तांना राजीनामा सादर केला. मात्र आयुक्तांनी त्यांचा राजीनामा नाकारून थोडा अवधी मागितला आहे. या मानहानीमुळे अभियंता आक्रमक झाले आहेत. मनसेचे गटनेते संदीप देशपांडे आणि नगरसेवक संतोष धुरी यांना अटक होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका अभियंत्यांनी घेतली आहे. त्याचवेळी मनसेच्या गटनेत्यांनी दहा दिवसांत खड्डे न बुजल्यास आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांना खड्ड्यांत उभे करण्याचा इशारा दिला आहे.

मनसेने काही दिवसांपूर्वी खड्डेप्रकरणी असाच इशारा दिला होता. तो त्यांनी बुधवारी खरा करून दाखवला. संजय दराडे यांना वरळी येथील त्यांच्या कार्यालयातून मनसेने केळकर रस्त्यावर आणले. तसेच जबरदस्तीने खड्ड्यात उभे करत ‘मी या खड्ड्यांसाठी जबाबदार आहे...’ असा फलक त्यांच्या हातात दिला होता. त्याचीच पुनरावृत्ती आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांसोबत करण्यात येईल, असा इशारा देशपांडे यांनी दिला आहे.