Join us  

ऑरेंज गेट ते ग्रँट रोड ५.६ कि.मीचा उन्नत मार्ग लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 10:01 AM

दक्षिण मुंबईची कोंडी कमी होणार.

मुंबई : ऑरेंज गेट ते ग्रँट रोड दरम्यान ५.६ किलोमीटर लांब उन्नत मार्ग बांधण्यासाठी पालिकेकडून मागच्याच महिन्यात नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून, यासाठी जे कुमार कंपनी पात्र ठरली आहे. या प्रकल्पासाठी पालिकेकडून या कंपनीला स्वीकृती पत्रही बहाल करण्यात आले आहे. पुढील साडेतीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईच्या पी. डीमेल्लो मार्गावरील कोंडी या मार्गामुळे कमी होणार आहे. ईस्टन फ्रीवेवरून वेस्टर्न वेला जोडण्यासाठी महापालिकेने फेब्रुवारी २०२३ मध्ये निविदा प्रक्रिया राबवली होती. त्यावेळी ऑरेंज गेट ते ग्रँट रोड दरम्यान उन्नत मार्ग बांधण्यासाठी ६३८ कोटींच्या निविदा मागवण्यात आल्या होत्या. 

हा एलिव्हेटेड ब्रिज जेजे पुलाच्या लांबीपेक्षा मोठा असून, ५.५६ किलोमीटर लांबीचा असणार आहे. परंतु, ऑगस्ट २०२३ मध्ये महापालिकेने उन्नत मार्गाची निविदा प्रक्रिया रद्द केली. उन्नत मार्गात काही तांत्रिक कारणे समोर आली असून, आधी हँकॉक पुलाचा काही भाग केबल आधारित होऊ शकतो, हे लक्षात आले. तसेच उन्नत मार्गांत जमिनीखाली युटिलिटीजचा विचार केला नव्हता. मात्र, त्यानंतर पालिकेकडून जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा निविदा मागवल्या आल्या असून, या निविदा प्रक्रियेत युटिलिटीजचा विचार करण्यात आला. अखेर प्रक्रियेत जे कुमार कंपनी त्यात पात्र ठरली असून, लवरकच प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

या भागातील नागरिकांना दिलासा :

१)  पूर्व मुक्त मार्गाला जोडलेल्या पी. डिमेल्लो मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित उन्नत मार्ग (पूल) हा अत्यंत आवश्यक आहे. यामुळे दक्षिण मुंबईतील नागरिकांचा प्रवास अधिक सुखद होऊन दक्षिण मुंबईतील विविध ठिकाणी उद्भवणाऱ्या वाहतूक कोंडीपासून सुटका होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

२)  सागरी किनारी रस्त्याला पूर्व मुक्तमार्गाशी जोडण्यासाठीही हा मार्ग महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. डॉ. बी. आर. आंबेडकर मार्ग, रफी अहमद किडवाई मार्ग, पोर्ट ट्रस्ट क्षेत्र, पी. डिमेलो रोड, पूर्व द्रुतगती महामार्ग, ग्रँट रोड परिसर, ताडदेव आणि मुंबई सेंट्रल या भागातील वाहतूक सुरळीत होणार आहे.

टॅग्स :मुंबईरस्ते वाहतूक