Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाजप प्रदेशाध्यक्षांसह उद्धवसेनेसाठी भांडुप पश्चिममध्ये प्रतिष्ठेची लढत

By मनीषा म्हात्रे | Updated: January 7, 2026 12:17 IST

बंडखोरी, स्थानिक प्रश्नांमुळे अनेक प्रभागांतील अधिकृत उमेदवारांसमोर कडवे आव्हान

मनीषा म्हात्रे लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : तळ कोकणाशी नाते सांगणाऱ्या नोकरदार वर्गाचा वरचष्मा असलेल्या भांडुप पश्चिम मतदारसंघात सात प्रभागांमध्ये यंदाची निवडणूक केवळ नगरसेवकांच्या निवडीपुरती मर्यादित राहिलेली नाही.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उद्धवसेनेचे खा. संजय पाटील आणि शिंदेसेनेचे आ. अशोक पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. बंडखोरी, अपक्ष उमेदवारी आणि स्थानिक प्रश्नांमुळे अनेक प्रभागांमध्ये अधिकृत उमेदवारांना कडवे आव्हान उभे राहिले आहे.

पायाभूत सुविधांच्या नावाखाली मतदारांना ठेंगा

आतापर्यंत निवडून येणारे लोकप्रतिनिधी फक्त लादीकरण, काँक्रिटचे रस्ते, शेड, चौक सुशोभीकरण ही वरवरची कामे करून पायाभूत सुविधांच्या नावाखाली मतदारांना ठेंगा दाखवत असल्याचे चित्र आहे. यंदा 'आश्वासने नको, विकास हवा', असे मतदारांचे म्हणणे आहे.

भांडुपच्या मध्यभागी चार प्रभागांची सीमारेषा असलेल्या प्रभाग क्रमांक ११४ मध्ये मनसेच्या माजी नगरसेविका अनिशा माजगावकर यांच्या बंडखोरीमुळे निवडणूक चर्चेत आली.

'होम ग्राउंड'वर कसोटी

रवींद्र चव्हाण यांचे मित्र संजय परब यांच्या पत्नी स्मिता यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटनही चव्हाण यांनी केले. डोंबिवलीत राहायला जाण्यापूर्वी ते भांडुपमध्ये राहत होते. त्यामुळे हा प्रभाग त्यांच्या दृष्टीने 'होम ग्राउंड' मानला जात आहे. मात्र मनसेच्या ज्योती राजभोज आणि शिंदेसेनेच्या उपविभाग प्रमुख नेहा पाटकर यांच्या बंडखोरीमुळे येथे तिरंगी लढतीचे चित्र आहे.

...म्हणून चुरस वाढली

खा. संजय पाटील यांच्या कन्या राजुल यांच्यासमोर त्यांचे आव्हान आहे. शिंदेसेनेच्या सुप्रिया धुरतही रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक १०९ मध्ये उद्धवसेनेच्या दीपाली गोसावी आणि भाजप पदाधिकारी गणेश जाधव यांच्या बंडखोरीमुळे लढत रंगतदार आहे. या प्रभागांमध्ये सुमारे ६० ते ७० टक्के मतदार मराठी भाषिक आहेत. त्या खालोखाल उत्तर व दक्षिण भारतीय, मुस्लीम मते आहेत.

आमदार पुत्राला बंडखोरीचे आव्हान

गेल्या वेळी ११३ प्रभागातून शिवसेनेच्या दीपमाला बढे यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला होता. येथून शिंदेसेनेचे भांडुप विधानसभा अध्यक्ष प्रवीण दहितुले आग्रही होते. मात्र, अखेरच्या क्षणाला शिंदेसेनेचे आ. पाटील मिळाली. यांचे पुत्र रुपेश यांना उमेदवारी त्याविरोधात दहितुले यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला. पक्षाने समजूत काढल्यानंतर त्यांनी अपक्ष अर्ज भरला नाही. मात्र, त्यांनी प्रचारात उतरणार नसल्याचे सांगितले.पाटील यांच्याविरुद्ध उद्धवसेनेच्या दीपमाला बढे रिंगणात आहेत. दुसरीकडे उद्धवसेनेचे महेश गोळे, भाजपचे शैलेश सुवर्णा यांच्या बंडखोरीमुळे चुरस वाढली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Prestige fight in Bhandup West for BJP, Uddhav Sena leaders.

Web Summary : Bhandup West witnesses a high-stakes election for BJP, Uddhav & Shinde Sena. Internal strife and local issues intensify competition. Voters prioritize development over empty promises.
टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६राजकारण