Join us  

BMC Election 2022: मुंबई महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; वार्ड पुर्नरचनेचा आराखडा आयोगाला सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 3:54 PM

मुंबई महापालिकेचा कालावधी फेब्रुवारी २०२२ मध्ये संपतोय. त्यामुळे आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत.

मुंबई – येत्या काही दिवसांत राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यात मुंबई, पुण्यासारख्या महापालिकांचा समावेश आहे. राज्यातील मुंबई वगळता इतर महापालिका निवडणुकीत प्रभाग रचनेने निवडणुका होणार आहेत. तर मुंबईत वार्ड संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे नवीन वार्ड रचनेचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलं आहे. मुंबईत आता २२७ वार्ड ऐवजी २३६ पर्यंत वार्ड वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे वार्ड रचना बदलण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने वार्ड पुर्नरचनेचा आराखडा शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. २०११ च्या लोकसंख्येच्या आधारे नव्या इमारती, वस्त्या, वाढीव बांधकामे झालेल्या परिसराचा विचार करता पुर्नरचनेचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई शहर, उपनगर आणि पूर्व उपनगरात प्रत्येकी ३ वार्ड वाढवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शहरातील वरळी, लोअर परेळ, पूर्व उपनगरात मानखुर्द, संघर्षनगर, माहूल तर पश्चिम उपनगरात बोरिवली, मालाड, वांद्रे या भागात वार्ड वाढवले जाऊ शकतात.

कोरोनाची परिस्थिती पाहता मुदत संपलेल्या महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. मुंबई महापालिकेचा कालावधी फेब्रुवारी २०२२ मध्ये संपतोय. त्यामुळे आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका वेळेवर व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरु आहेत. परंतु ओमायक्रॉनमुळे जर रुग्णसंख्येत भर होत गेली तर मुंबईसह इतर महापालिका निवडणुकाही लांबणीवर पडतील. सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता आहे.

शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेने ९१ जागा जिंकल्या होत्या तर भाजपाला ८३ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले होते. परंतु काही वर्षापूर्वी मनसेच्या ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेना नगरसेवकांचे संख्याबळ ९७ वर पोहचले. यंदाच्या निवडणुकीत ९ नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात ३.८७ टक्के इतकी लोकसंख्या वाढ २००१ ते २०११ या काळात झालेली होती. त्याआधारे २०२१पर्यंतची लोकसंख्या वाढ गृहित धरून नगरसेवक संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे वार्ड पुर्नरचनेत कुणाला फायदा होईल हे निवडणुकीच्या निकालात कळेल.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका