Join us
Daily Top 2Weekly Top 5

बीएमसी निवडणूक: यंदा 15 वॉर्ड अनुसूचित जातींसाठी आरक्षित

By admin | Updated: October 3, 2016 17:04 IST

गामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आज प्रभाग आरक्षणाची सोडत जारी झाली आहे. महापालिकेच्या 227 पैकी 15 वॉर्ड अनुसूचित जातींसाठी आरक्षित

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 3 -  आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आज प्रभाग आरक्षणाची सोडत जारी झाली आहे. महापालिकेच्या 227 पैकी 15 वॉर्ड अनुसूचित जातींसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात आज दुपारी ही सोडत जारी झाली.

 
26, 53, 93, 121, 142, 146,152, 155, 169, 173, 195, 198, 200, 210 आणि 225 हे 15 प्रभाग अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यापैकी 53, 93, 121, 142, 200, 210 आणि 225 हे प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित असतील.
 
याशिवाय अनुसूचित जमातींसाठी 59,99 या वॉर्डमध्ये आरक्षण असेल. यापैकी 59 क्रमांकाचा वॉर्ड अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित आहे.
 
15 राखीव प्रभागांना निवडणूक आयोगाची मान्यता
 
2017 च्या निवडणुकीसाठी महापालिकेने 227 पैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या जास्त असलेल्या 60 वॉर्डांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली होती. त्यापैकी 15 वॉर्ड राखीव ठेवण्यात आले आहेत. त्याला 30 सप्टेंबरला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्याची सोडत आज जाहीर झाली आहे.
 
पुनर्रचनेमुळे अनेकांचे वॉर्ड गायब
 
सर्वच राजकीय पक्षातील नगरसेवकांच्या प्रभागावर पुनर्रचनेची कुऱ्हाड कोसळली आहे. मुंबई शहरातील सात नगरसेवकांचे वॉर्ड गायब झाले असून उपनगरात सात प्रभाग वाढले आहेत.
 अनेक नगरसेवकांचे प्रभाग फुटले.
 
मुंबईतील लोकसंख्या घटली, वॉर्डरचनेत बदल
 
मुंबई शहराची लोकसंख्या कमी झाली असली तरी उपनगरांमधली लोकसंख्या वाढली आहे. म्हणून वॉर्डरचनेतही बदल होणार आहेत. उपनगरात अनुसूचित जातीची लोकसंख्या वाढली आहे.
 
साधारणपणे 54 ते 55 हजार लोकांमागे एक नगरसेवक असेल, अशी माहिती आहे. सध्या बहुतांशी वॉर्ड रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूला पूर्व आणि पश्‍चिम असे विस्तारलेले आहेत. त्यामुळे नव्या रचनेत रेल्वेमार्गांमुळे प्रभाग छेदले जाणार नाहीत, याची काळजी घेतली आहे.
 
हे वॉर्ड कमी होणार
 
ए (फोर्ट), बी (पायधुनी), सी (चंदनवाडी), डी (ग्रँट रोड) ई (भायखळा) या विभागातील प्रत्येकी एक, तर जी दक्षिण (प्रभादेवी) विभागातील दोन वॉर्ड कमी होणार आहेत.
 
पूर्व उपनगरात एम पूर्व (चेंबूर), एन (घाटकोपर) या दोन विभागातील प्रत्येकी एक वॉर्ड कमी झाला असून एल (कुर्ला) आणि एस (भांडुप) विभागात एक वॉर्ड वाढला आहे. याशिवाय एम पूर्व (मानखुर्द) विभागात दोन वॉर्ड वाढले आहेत.
 
पश्चिम उपनगरातील एच पूर्व (सांताक्रूझ) विभागातील एक वॉर्ड कमी झाला आहे. तर पी दक्षिण (गोरेगाव) आणि आर उत्तर (दहिसर) या विभागातील वॉर्डची संख्या एकने वाढली आहे. तसंच पी उत्तर (मालाड), आर दक्षिण (कांदिवली) विभागात प्रत्येकी दोन वॉर्ड वाढणार आहेत.