Join us  

गिरगाव चौपाटीवर आले ब्ल्यू बटण जेली फिश, पर्यटकांमध्ये घबराट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 6:25 PM

गिरगाव चौपाटीवर जेलीफिश आल्यामुळे पर्यटक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

- मनोहर कुंभेजकरमुंबई - नेहमी पावसाळया आधी ब्लू बटण नामक जेली फिश किनाऱ्यावर पाहायला मिळतात. आज गिरगाव चौपाटीच्या किनाऱ्यावर भरपूर प्रमाणात आलेले ब्लू बटण  जेली फिश पाहून येथील पर्यंटकांमध्ये जेली फिश हा चर्चेचा विषय बनला होता. गिरगाव चौपाटीवर जेलीफिश आल्यामुळे पर्यटक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.गेल्या वर्षी आकसा व जुहू चौपाटीवर मोठ्या संख्येने जेलिफिश आले होते.पावसाळ्यात समुद्राकडून जमिनीकडे जोरात वारे वाहतात. त्यामुळे जेली फिश व इतर जीव किनाऱ्यावर येतात. पावसाळ्यात आधी ब्लू बटण नंतर ब्लू बॉटल मग इतर जेली फिश येणे सुरू होते. यात सगळ्यात त्रासदायक ब्लू बॉटल आहे ज्यात जास्त प्रमाणात विष आढळते. समुद्राचे तापमान वाढल्यामुळे यांचे पुनरुत्पादन वाढले आहे. काही दिवसांपूर्वी अक्सा बीचच्या किनाऱ्यावरसुध्दा असे जेली फिश आले होते अशी माहिती मुंबईतील 6 चौपट्यांवर जीवरक्षक उपलब्ध करून देणाऱ्या दृष्टी लाईफ सेव्हिंग कंपनीचे व्यवस्थपक किरण शेलार यांनी लोकमतशी बोलतांना ही माहिती दिली. मात्र आज कोणाला जेली फिश चावल्याच्या घटना घडल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.जेली फिशचा स्पर्श झाल्यास अंगावर लाल चट्टे, खाज येणे, सूज येणे अशी लक्षणे दिसतात. कोणतेही जेली फिश शरीराला चिकटल्यानंतर घाबरून न जाता ते काढून खारट पाण्याने किंवा समुद्राच्या च पाण्याने धुऊन त्यावर बर्फाने शेक द्यावा. तसेच जीवरक्षकांकडे असलेले व्हाईट व्हिनेगर कापसावर घेऊन त्याचा वापर करावा अशी माहिती शेलार यांनी दिली.गेल्या तीन वर्षांपूर्वी गणपती विसर्जनाच्या वेळी गिरगाव चौपाटीवर मोठ्या संख्येने जेलीफिश आल्यामुळे गणेश भक्तांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मत्स्यविभागाने केलेल्या पाहणीमध्ये गिरगाव चौपाटीवर ह्यस्टिंग रेह्ण ही आढळले होते अशी माहिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी लोकमतला दिली. हे जेलीफिश गडद निळ्या रंगाचे फुग्याच्या आकाराचे असून दरवर्षी पावसाळ्यात ते येथे समुद्रकिनारी येत असून ते गणपती विसर्जनाच्या वेळी देखील मुंबईसमुद्रकिनारी आढळतात अशी माहिती त्यांनी दिली. जेलीफिश चावल्यावर गरम पाण्याचा मारा करावा असे उपचार त्यांनी सांगितले.पालिकेच्या सेवेत लाईफगार्ड म्हणून 34 वर्षे रजनीकांत माशेलकर कार्यरत होते. जेलिफिशबाबत माहिती देताना ते सांगतात की, हे जेलीफिश पावसाळ्यात प्रजोत्पादनाच्यावेळी समुद्रकिनारी येतात, यंदा ते उशीरा आले. हे जेलीफिश निळ्यारंगाचे फुग्यासारखा त्यांचा आकार असून त्याच्या आत 7 ते 8 इंचाचा विषारी धागा असतो.पाण्यात आपण गेल्यावर त्यांचा असलेला विषारी धाग्याने तो शरीरावर चाबकासारखा जोरात फटका मारतो. जर पायावर चावला यर शरीराच्या वरच्या भागात गाठ येते. जर वरच्या भागाला या जेलीफिशने डंख केला तर खालच्या भागाला गाठ येते आणि ती एक तास राहते अशी माहिती माशेलकर यांनी दिली. जेलीफिश चावल्यावर अंगाची लाहीलाही होते. समुद्रात जेलीफिशने डंख मारल्यावर मासे देखील मरतात. तर समुद्राच्या बाहेर आल्यावर हे जेलीफिश मरतात अशी माहिती माशेलकर यांनी दिली. त्यामुळे समुद्रात उतरणाऱ्या नागरिकांनी किमान पावसाळ्यात तरी गमबुट घाला असे आवाहन त्यांनी केले. समुद्राच्या या जेलीफिशच्या दंशामुळे त्वचेवर पुरळ येणे, खाज येणे, त्वचेची लाही होणे असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी पाण्यात जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे

टॅग्स :मुंबई