Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्र्र्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून रक्तदान, मूकमोर्चाद्वारे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 06:43 IST

विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी राज्यातील २७०० प्रशिक्षणार्थी डॉक्टर मंगळवारी मध्यरात्रीपासून संपावर आहेत. राज्यभरातील डॉक्टर विविध जिल्ह्यांतील रुग्णालयांत निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधत आहेत.

मुंबई : विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी राज्यातील २७०० प्रशिक्षणार्थी डॉक्टर मंगळवारी मध्यरात्रीपासून संपावर आहेत. राज्यभरातील डॉक्टर विविध जिल्ह्यांतील रुग्णालयांत निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधत आहेत. गुरुवारी संपाच्या दुसऱ्या दिवशी या डॉक्टरांनी के.ई.एम. रुग्णालयात रक्तदान करून व शीव रुग्णालयात मूकमोर्चा काढून सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपावर असल्याने शासकीय रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे.गुरुवारी जागतिक रक्तदाता दिन असल्याने रुग्णांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी २०पेक्षा अधिक संपकरी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी के.ई.एम. रुग्णालयात रक्तदान केले. असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इन्टर्न्स (अस्मि) या संघटनेचे सरचिटणीस डॉ. गोकूळ राख यांनी ही माहिती दिली. लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असलेल्या व शीव रुग्णालयात इंटर्नशिप करीत असलेल्या डॉक्टरांनी सायंकाळी ५ वाजता अधिष्ठाता कार्यालयाकडून अतिदक्षता विभागाच्या इमारतीपर्यंत मूक मोर्चा काढत सरकारच्या अन्यायी धोरणाचा निषेध केल्याची माहिती संघटनेचे कोषाध्यक्ष डॉ. आदित्य येरंडीकर यांनी दिली. शीव रुग्णालयातील सुमारे १०० प्रशिक्षणार्थी डॉक्टर या मूकमोर्चामध्ये सहभागी झाले होते.संघटनेच्या काही प्रमुख मागण्याप्रशिक्षणार्थी डॉक्टरांना दरमहा १५ हजार रुपये विद्यावेतन द्यावे, फेब्रुवारी २०१८पासून ही रक्कम देण्यात यावी, ठरावीक वेळेने प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या विद्यावेतनामध्ये पुरेशी वाढ करावी, जेणेकरून भविष्यात असा संप करण्याची वेळ येणार नाही, अशा मागण्या संघटनेने सरकारकडेकेल्या आहेत.

टॅग्स :डॉक्टरबातम्या