Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना शाखांमधून रक्तदान शिबिरे टप्प्याटप्प्याने आयोजित करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:06 IST

मनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई--महाराष्ट्राला दररोज रक्ताची गरज ३ हजार ते ५ हजार युनिट्स इतकी असून महिन्याला एक ...

मनोहर कुंभेजकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई--महाराष्ट्राला दररोज रक्ताची गरज ३ हजार ते ५ हजार युनिट्स इतकी असून महिन्याला एक ते दीड लाख युनिट इतकी आहे.एप्रिल,मे व जून महिन्यात रक्ताची मोठी चणचण भासणार आहे. पावसाळ्यात डेंग्यू डोके वर काढू शकेल, त्यामुळे प्लेटलेटची गरज पडणार आहे तसेच कोविडसाठी जास्त प्लाझ्माची गरज आहे. अपघातग्रस्त रुग्णांसाठी रक्त आवश्यक आहे. थॅलेसेमिया रुग्णांना नियमित वेळा रक्ताची गरज लागते.तसेच प्लॅन केलेल्या मेजर सर्जरी,बायपास यासाठी एक मिशन ब्लड डोनेशन म्हणून शिवसेनेच्या मुंबईतील २२७ शाखांनी कार्यक्रम हाती घेणे आवश्यक आहे अशी सूचना राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

मुंबईतील शिवसेनेच्या शाखेनिहाय २० ते २५ रक्तदात्यांनी रक्तदान केल्यास २२७ शाखांमार्फत मोठ्या प्रमाणात रक्तदान होऊ शकेल आणि जुलै महिन्यापर्यंत रक्त व त्यांचे रक्तघटक जमा होऊ शकेल, असा विश्वास डॉ.दीपक सावंत यांनी व्यक्त केला.

पुढील महिन्यात येणाऱ्या रक्तांच्या चणचणीमुळे महाराष्ट्रात थॅलेसेमिया रुग्ण,असलेल्या सर्जरी तसेच अपघातातील रुग्ण या सर्व गोष्टींसाठी लागणारी रक्ताची गरज तसेच निगेटिव्ह रक्त ग्रुपची

उपलब्धता या सर्व बाबींवर माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत, महाराष्ट्राच्या आरोग्य संचालिका डॉ. साधना तायडे व रक्त परिषदेच्या प्रमुखपदी असलेल्या डॉ.थोरात यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

कोविडच्या पार्श्वभूमीवर सध्या रक्तदान शिबिरे कमी झाली आहे. तसेच लसीकरणामुळे ऐच्छिक रक्तदाते हे ६०ते ७० दिवस रक्तदान करू शकणार नाही.त्याच बरोबर गृहनिर्माण सोसायट्या,लालबागचा राजा,कच्छी ग्रुप, सिद्धीविनायक, रोटरी क्लब, उमंग, रेल्वे मजदूर युनियन, आयसीआयसीआय बँक या सारख्या संस्था रक्तदानात अग्रेसर असतात. त्यांना महाराष्ट्र रक्त संकलन परिषदेने संपर्क साधलेला आहे. त्यापैकी काही संस्था पुढे येऊन रक्तदान शिबिरे घेणार आहेत. मात्र याबाबत आरोग्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संस्थांशी संपर्क साधला तर या संस्था नक्कीच पुढाकार घेऊन रक्तदान शिबिरे घेतील, असे मत डॉ.दीपक सावंत यांनी व्यक्त केले.

लसीकरणासाठी पात्र असलेल्या ऐच्छिक रक्तदात्यांना टप्प्याटप्प्याने रक्तदान करून मगच लसीकरण करावे. अन्यथा त्यांना ६० ते ७० दिवस रक्तदान करता येणार नाही ही मोठी अडचण निर्माण होईल आणि रक्ताची चणचण अधिक भासेल. आपण हा सर्व अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला असल्याचे डॉ.दीपक सावंत यांनी सांगितले.

-----------------------