Join us

वर्सोव्यात मध्यरात्री अडीचपर्यंत सुरू होते रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:05 IST

२०७ युनिट रक्त संकलनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या काळात राज्यात जाणवणाऱ्या रक्तटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व ...

२०७ युनिट रक्त संकलन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या काळात राज्यात जाणवणाऱ्या रक्तटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत वर्सोवा, यारी रोड प्रभाग क्रमांक ५९ च्या युवा अल्पसंख्याक समाजाची मोलाची साथ मिळाली. सध्या सुरू असलेल्या रमजानच्या पवित्र महिन्यात अल्पसंख्याक बांधवांसह समाजातील महिलांनीही उस्फूर्त सहभाग घेतला आणि मध्यरात्रीपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करून एक आदर्श ठेवला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ब्लड बँकेच्या पथकाने २०७ युनिट रक्त संकलन केले.

सध्या मुंबईत ठिकठिकाणी आणि अन्यत्र सुद्धा रक्तदान शिबिर साधारणपणे सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित केली जातात. मात्र क्लाराज कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य अजय कौल यांच्या मार्गदर्शनाखाली वर्सोवा अल्पसंख्याक समाजाच्या वतीने रोझा सोडल्यानंतर प्रथमच शनिवारी २४ एप्रिल रोजी रात्री ८.३० ते साेमवार २५ एप्रिल रोजी पहाटे २.३० वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित केले. मुंबईसह राज्यातील अशाप्रकारे मध्यरात्रीपर्यंत चाललेले हे पहिलेच रक्तदान शिबिर असल्याची माहिती पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष व वर्सोवा विधानसभा संघटक यशोधर फणसे यांनी ‘लोकमत’ला दिली.

यावेळी परिवहनमंत्री व विभागप्रमुख ॲड. अनिल परब यांनी रात्रीच्या वेळेस रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे तसेच यारी रोड वर्सोवा अल्पसंख्याक समाजाचे व प्राचार्य अजय कौल यांचे आभार मानले. रक्तदानासाठी तरुणांचा विशेष सहभाग होता. युवाशक्ती हा देशाचा विजय आहे आणि अशी उदात्त कामे करून या तरुणांनी समाजाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या तरुणांनी समाजाला नवी दिशा दिली आहे, हे एक स्तुत्य पाऊल आहे असे गौरवोद्गार ॲड. अनिल परब यांनी यावेळी काढले. विशेष म्हणजे त्यांनी वर्सोवा, यारी रोड येथे आयोजित रात्रीच्या रक्तदान शिबिराला जात असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देताच मुख्यमंत्र्यांनीही या रक्तदान शिबिराचे काैतुक केले.

यावेळी यशोधर फणसे, पालिकेच्या आरोग्य समिती अध्यक्षा राजूल पटेल, बाजार उद्यान समिती अध्यक्षा व स्थानिक नगरसेविका प्रतिमा खोपडे, वर्सोव्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिराज इनामदार, उपविभागप्रमुख प्रसाद आयरे, वीणा टाॅक, शाखाप्रमुख सतीश परब, दयानंद सावंत, उदय महाले, बेबी पाटील, क्लाराज कॉलेज ऑफ कॉमर्सचे ॲक्टिव्हिटी चेअरमन प्रशांत काशीद तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

उपशाखाप्रमुख तारीक पटेल, फैजल कश्मिरी, इक्बाल फर्निचरवाला, एजाज विराणी, अनिस जलनावी, सय्यद आलम, गटप्रमुख सलिम शेख, प्रशांत मुरावाला यांच्यासह अनेक मुस्लीम समाजातील बांधवांनी प्रथमच रात्रीचे रक्तदान शिबिर आयोजन करण्याचा धाडसी प्रयत्न यशस्वी केला.

क्लाराज कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य अजय कौल आणि शिवसेना शाखा क्रमांक ५९ तर्फे अलीकडेच रक्तदान शिबिर दिवसा आयोजित केले होते. मात्र रमजानमुळे आम्ही यावेळी सहभागी हाेऊ शकलाे नाही. त्यामुळे आमच्यासाठी येथे रात्री रक्तदान शिबिर आयोजित करावे, अशी विनंती वर्सोवा अल्पसंख्याक समाजाने प्राचार्य अजय कौल यांना केली आणि येथे मध्यरात्रीपर्यंत रक्तदान शिबिर

यशस्वीपणे आयोजित केले, अशी माहिती या संस्थेच्या

पदाधिकाऱ्यांनी दिली.

----------------------------------------