Join us

धान्य काळ्याबाजाराची तक्रार एसीबीकडे करणार

By admin | Updated: May 16, 2015 00:02 IST

मुंबईतील रेशन दुकानांमध्ये सुरू असलेल्या काळ्याबाजाराची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्याचा निर्णय मुंबई रेशनिंग

मुंबई : मुंबईतील रेशन दुकानांमध्ये सुरू असलेल्या काळ्याबाजाराची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्याचा निर्णय मुंबई रेशनिंग दुकानदार संघटनेने घेतला आहे. शुक्रवारी ‘लोकमत’ने रिअ‍ॅलिटी चेक करताना रेशन वितरणातील काळाबाजार उघडकीस आणला होता. ‘लोकमत’ने केलेल्या रिअ‍ॅलिटी चेकने प्रशासन आणि दुकानदारांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातल्याची प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष नवीन मारू यांनी व्यक्त केली. मारू म्हणाले की, या प्रकरणी वृत्ताचे कात्रण घेऊन संघटनेतर्फे रीतसर तक्रार एसीबीकडे करणार असून, त्याची एक प्रत सीबीआयलाही पाठवणार आहे. भाड्याने दुकान चालवणाऱ्या दुकानदारांकडून काळाबाजार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे राज्यभर सररास सुरू असलेल्या काळाबाजाराची चौकशी करण्याची मागणीही निवेदनात करणार असल्याचे मारू यांनी सांगितले.याबाबत शिधावाटप नियंत्रक यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. मात्र राज्याच्या सचिवांनी या प्रकरणी विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवाय या प्रकरणी चौकशीचे आदेशही देण्यात आल्याचे समजते. एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, लवकरच शिधावाटप प्रक्रिया बायोमॅट्रिक पद्धतीने राबवण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला आळा बसेल. प्रशासन वारंवार कारवाई करत असले, तरी प्रत्येक दुकानदारामागे दिवसभर बसून राहणे शक्य नाही. बहुतेक दुकानदारांचे कागदोपत्री व्यवहार चोख असतात. त्यामुळे कारवाईच्या कचाट्यातून त्यांची सुटका होत असल्याची शक्यताही त्या अधिकाऱ्याने व्यक्त केली. (प्रतिनिधी)