Join us
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या-पिवळ्या टॅक्सी वातानुकूलित?

By admin | Updated: December 8, 2014 01:29 IST

मेरू, टॅबसारख्या खासगी एसी टॅक्सी वाहनांनी स्पर्धा निर्माण केल्याने काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालकांना या स्पर्धेत टिकून राहणे कठीण झाले आहे

मुंबई : मेरू, टॅबसारख्या खासगी एसी टॅक्सी वाहनांनी स्पर्धा निर्माण केल्याने काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालकांना या स्पर्धेत टिकून राहणे कठीण झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी काळ्या-पिवळ्या टॅक्सीतही एसीची परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात होती. आता या मागणीवर एमएमआरटीकडून (मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण) सकारात्मक विचार करण्यात येत असून, दोन दिवसांपूर्वीच झालेल्या बैठकीत चर्चाही करण्यात आली. पुढील बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सर्वसामान्यांची सेवा अशी ओळख असणाऱ्या काळया-पिवळ्या टॅक्सीची मुंबई शहर आणि उपनगरात मोठी संख्या आहे. सध्या ३५ हजार काळ्या-पिवळ्या टॅक्सी रस्त्यावर धावत आहेत. यामध्ये फियाट म्हणून ओळख असणाऱ्या टॅक्सीत हळूहळू बदल होत गेले आणि मारुती, इंडिका, सेन्ट्रो अशा कार काळ्या-पिवळ्या टॅक्सी म्हणून धावू लागल्या. त्याला प्रवाशांकडून पसंतीही मिळाली. मात्र मेरू, टॅब, ओलासह एसी खासगी टॅक्सी सेवांनी प्रवेश करीत चांगलीच स्पर्धा निर्माण केली. त्यामुळे काळ्या-पिवळ््या टॅक्सीचालकांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ लागला. हे पाहता काळ्या-पिवळ््या टॅक्सीतही प्रवाशांसाठी एसीची परवानगी द्यावी अशी मागणी टॅक्सी संघटनांकडून होऊ लागली. यासाठी सध्याच्या धावत असलेल्या नविन काळ्या-पिवळ््या टॅक्सीत एसी असून तो सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी चालकांतून होत आहे. मात्र एमएमआरटीएकडून त्याला परवानगी देण्यात येत नव्हती. गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळ होत असलेल्या या मागणीचा अखेर एमएमआरटीएकडून विचार केला जात असून, दोन दिवसांपूर्वीच झालेल्या बैठकीत त्यावर चर्चा करण्यात आली. यावर सकारात्मक विचार एमएमआरटीएकडून करण्यात आला आहे. काळ्या-पिवळ््या टॅक्सीला एसीची परवानगी द्यावी अशी मागणी टॅक्सी संघटनांची आहे. यावर विचार सुरू असून पुढील इतिवृत्तांतमध्ये त्याचा समावेश करून आणि एमएमआरटीएच्या सदस्यांशी चर्चा करुन त्याला परवानगी देण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती एमएमआरटीएचे अध्यक्ष शैलेश कुमार शर्मा यांनी दिली.