Join us

बीकेसीमधील कोंडी सुटणार !

By admin | Updated: January 24, 2015 00:53 IST

मुंबापुरीतील व्यापारी केंद्र म्हणून वांद्रे-कुर्ला संकुलाची दिवसेंदिवस भरभराट होत असतानाच येथील वाहतुकीचा प्रश्न मात्र सुटलेला नाही.

मुंबई : मुंबापुरीतील व्यापारी केंद्र म्हणून वांद्रे-कुर्ला संकुलाची दिवसेंदिवस भरभराट होत असतानाच येथील वाहतुकीचा प्रश्न मात्र सुटलेला नाही. दिवसेंदिवस येथून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या वाढतच असून, चाकरमान्यांना त्यामुळे ऐन पीक अवरला वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. ही वाहतुकीची कोंडी सुटावी आणि चाकरमान्यांचा मार्ग सुकर व्हावा, म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे वांद्रे-कुर्ला संकुलात ४ फ्लायओव्हर उभारण्यात येणार असून, १ रस्ताही बांधण्यात येणार आहे.सद्य:स्थितीत मुंबईमधील अत्यंत विकसित संकुल म्हणून वांद्रे-कुर्ला संकुलाकडे पाहिले जाते. आर्थिक संस्था, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बँका, कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये, सरकारी आणि निमसरकारी कार्यालये, पंचतारांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट, मुंबई क्रिकेट असोसिएशन अशा अनेक वास्तू वांद्रे-कुर्ला संकुलात उभ्या राहिल्या आहेत; आणि या वास्तूंनी लाखो चाकरमान्यांच्या हाताला रोजगार दिला आहे. मात्र जेवढ्या वेगाने येथे वास्तू उभ्या राहिल्या; जेवढ्या वेगाने चाकरमान्यांच्या हाताला रोजगार मिळाला, तेवढ्या वेगाने येथील वाहतुकीचा विकास झालेला नाही. वांद्रे-कुर्ला संकुलातील मुख्य रस्ताच हा कायम वाहतुकीसाठी वापरण्यात आल्याने त्यावर आता वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. ऐन पीक अवरला म्हणजे सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते १० या वेळात चाकरमान्यांना येथील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.एका सर्वेक्षणानुसार, दररोज पीक अवरवेळी सरासरी दर ताशी तब्बल १२ हजार वाहने वांद्रे-कुर्ला संकुलातील जंक्शनवर गर्दी करीत आहेत. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने ४ फ्लायओव्हर आणि १ रस्ता उभारण्यात येणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुल ते सी-लिंककडे जाणारा फ्लायओव्हर, तसेच सी-लिंक ते वांद्रे-कुर्ला संकुलाकडे येणारा फ्लायओव्हर हे दोन पदरी बांधण्यात येणार आहेत. या दोन्ही फ्लायओव्हरची एकूण लांबी १ हजार ८८८ मीटर इतकी असणार आहे.धारावीकडून पश्चिम द्रुतगती मार्गाकडे जाणाऱ्या फ्लायओव्हरला वांद्रे-कुर्ला संकुलाकडून येणारा फ्लायओव्हर कलानगर जंक्शन येथे दुसऱ्या स्तरावर येऊन मिळणार आहे; आणि तेथून पुढे पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या दिशेने जाणारा फ्लायओव्हर तीन पदरी बांधण्यात येणार आहे. या दुसऱ्या स्तरावरील फ्लायओव्हरची लांबी २ हजार ९२० मीटर इतकी असणार आहे. शिवाय धारवीकडून सी-लिंककडे जाणारी वाहतूक अव्याहत ठेवण्यासाठी शासकीय जमिनीहून ३०० मीटर लांबीचा व १२ मीटर रुंदीचा रस्ता बांधण्यात येणार आहे. या एकूण प्रकल्पासाठीचा अंदाजित खर्च २२७ कोटी इतका आहे, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली. (प्रतिनिधी)मुंबई ते अहमदाबाद अशी बुलेट टे्रन धावणार असल्याची चर्चा यापूर्वीच राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर रंगली असून, बुलेट टे्रनचे मुंबईमधील सेंटर बीकेसीमध्ये असण्याची शक्यता आहे. परिणामी साहजिकच जेव्हा केव्हा बुलेट टे्रन मार्गी लागेल तेव्हा येथे वाढणारी वाहतूकीची कोंडी सोडविण्यासाठी नव्याने बांधण्यात येणारे चार फ्लायओव्हर पूरक ठरतील.वांद्रे-कुर्ला संकुलात प्रवेश करण्यासाठी लाल बहादूर शास्त्री मार्गावर कुर्ला डेपो आणि कलिना मार्गावर रस्ते आहेत. या रस्त्यांवर सकाळी आणि सायंकाळी पीक अवरला वाहतूकीची मोठी कोंडी होते. नव्याने होणारे फ्लायओव्हर ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हातभार लावतील.वांद्रे पूर्वेकडूनदेखील वांद्रे-कुर्ला संकुलात प्रवेश करण्यासाठी कलानगर जंक्शन येथे मोठा चार पदरी रस्ता आहे. परंतू कलानगर जंक्शन येथेही सकाळसह सायंकाळी मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नव्याने बांधण्यात येणारे फ्लायओव्हर आणि रस्ता पूरक ठरतील.