Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा जाहीरनामा म्हणजे लोकशाहीची थट्टा-राहुल शेवाळे

By admin | Updated: February 9, 2017 05:00 IST

मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचा भाजपाचा जाहीरनामा म्हणजे लोकशाहीची थट्टा असल्याची टीका शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी बुधवारी केली.

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचा भाजपाचा जाहीरनामा म्हणजे लोकशाहीची थट्टा असल्याची टीका शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी बुधवारी केली. शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महापालिका अर्थसंकल्पातील अनेक घोषणा भाजपाने उचलल्या आहेत. महापालिकेच्याच योजना जाहीरनाम्यात टाकून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचे शेवाळे म्हणाले. कंत्राटदारांना पोसण्यासाठीच पालिकेत डिफर पेमेंट सिस्टीम आणण्याचा भाजपाचा डाव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा सध्या पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारत आहेत. महापालिकेत पारदर्शकता हवी म्हणणारे अडीच वर्षे गप्प का बसले. पालिकेतील पारदर्शक कारभारासाठी या आधीच त्यांनी पालिका आयुक्तांना आदेश का दिले नाहीत, असा सवालही शेवाळे यांनी केला. भाजपाने स्टॅम्प पेपरवर आपला जाहीरनामा प्रकाशित केला. मुख्यमंत्रिपदावर आरूढ होतानाच पारदर्शक कारभाराची शपथ घेतली जाते. लोकप्रतिनिधींचेही तसेच असते. तरीही भाजपाची मंडळी हुतात्मा चौकात पोहोचली. स्टॅम्प पेपरवर जाहीरनामा दिला, याचा अर्थ त्यांनी आधी घेतलेली शपथ खोटी होती का, असा सवालही त्यांनी केला. (प्रतिनिधी)