अनिकेत घमंडी, डोंबिवलीठाणे जिल्ह्यातील १८ पैकी किमान १० जागांवर विजयाची आशा असलेल्या शिवसेनेची मजल केवळ ६ जागांपर्यंतच गेली. ठाण्यासारख्या प्रतिष्ठेच्या मतदारसंघातूनही पराभव पदरी पडल्यामुळे शिवसेनेच्या गोटात सन्नाटा पसरला होता. तोळामासा म्हणून हिणवल्या जाणाऱ्या भाजपाने सात जागांवर विजय मिळविला़ तसेच कल्याण पूर्वेतील अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनीही ज्याची सत्ता त्यालाच साथ देण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे बालेकिल्ल्यामध्ये भाजपाचे खऱ्या अर्थाने कल्याण झाले असून शिवसेनेची मात्र कोंडी झाली आहे. विजय अपेक्षित नसलेल्या उमेदवारांनीही विजयी पताका फडकवल्यामुळे भाजपाचा उत्साह द्विगुणित झाला आहे. यामुळेच शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी ५२ हजारांचे विक्रमी मताधिक्य घेतल्यानंतरही विजयी मिरवणूक काढली नाही. ठाण्यातून रवींद्र फाटक, कल्याण पूर्वेतून गोपाळ लांडगे, कल्याण पश्चिमेतून विजय साळवी आणि ऐरोलीतून विजय चौगुले, डोंबिवलीतून दीपेश म्हात्रे, शहापूरसह मुरबाड आदी ठिकाणी त्या पक्षाच्या उमेदवारांचा विजय शिवसेनेला अपेक्षित होता. मात्र, त्या सर्वांना पराभव पत्करावा लागल्याने ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. नेमकी चूक कुठे झाली, यावरून संघटनेतल्या नेत्यांमध्ये बराच खल सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रभावापुढे आपले संघटनात्मक कौशल्य फिके पडले, असेच सर्वांचे मत सैनिकांनी व्यक्त केले.
भाजपाचे ‘कल्याण’
By admin | Updated: October 22, 2014 22:57 IST