Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोकणी मतांवर भाजपाचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2016 04:30 IST

येत्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी, कोकणी मतांवर डोळा ठेवून भाजपाच्या नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून भाजपाच्या

मुंबई : येत्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी, कोकणी मतांवर डोळा ठेवून भाजपाच्या नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून भाजपाच्या कोकण विकास आघाडीतर्फे एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातून कोकणातील गावांचे प्रमुख नेमण्यात येणार असल्याची माहिती मिळते.भांडुपसह कांजूरमार्ग विक्रोळी आणि मुलुंड पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोकणी माणूस गेल्या कित्येक वर्षांपासून वास्तव्यास आहे. पूर्वी हा पट्टा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र सेनेपासून राज ठाकरे विभक्त झाल्यानंतर याच कोकणी मतांवर मनसेचे दोन आमदार आणि पाच नगरसेवक या पट्ट्यातून निवडून आले होते. शिवसेनेने पुन्हा मुसंडी मारत दोन आमदार निवडून आणले. पालिका निवडणुकीत हीच कोकणी मते आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न भाजपाने सुरू केला आहे. कोकणातील बहुतांश चाकरमानी या पट्ट्यात वास्तव्यास आहेत. त्यामुळे कोकणातील गावांचा विकास करण्यासाठी प्रत्येक गावातील मुंबईत राहणारी एक व्यक्ती प्रमुख म्हणून नेमण्याचा विचार भाजपा करत आहे. या व्यक्तीच्या मदतीने त्या गावचे प्रश्न मुंबई पातळीवर मंत्रालयातून सोडवून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे एका भाजपा पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. (प्रतिनिधी)