मुंबई : युती तुटल्याने लढविलेल्या सुमारे दुप्पट जागा, मतदारांच्या संख्येत व मतदानात झालेली वाढ आणि मोदी लाटेचा प्रभाव या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून आताच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या मतांची संख्या आणि मतांची टक्केवारी या दोन्हीमध्य, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सुमारे दुप्पट वाढ झाल्याचे निकालांच्या विश्लेषणावरून दिसते.२००९ च्या निवडणुकीत भाजपाने ११९ मतदारसंघात उमेदवार उभे केले होते व त्या सर्वांना मिळून ६३ लाख ५२ हजार १४७ मते मिळाली होती. एकूण मतदानाच्या ही टक्केवारी १४.०२ टक्के होती. आता या पक्षाने २६६ मतदारसंघांत निवडणूक लढविली व त्यांना पूर्वीच्या दुप्पट म्हणजे २७.८ टक्के या प्रमाणात एकूण एक कोटी ४७ लाख ९ हजार ४५५ मते मिळाली.तर शिवसेनेचा मतांचा टक्का आणि त्या पक्षास मिळालेली एकूम मते यातही यावेळी चांगली वाढ झाली. गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या १६० उमेदवारांना मिळून ७३ लाख ६९ हजार ३० मते मिळाली होती व एकूण मतदानात सेनेच्या मतांचा टक्का १६.२६ होता. यावेळी शिवसेनेने २८६ जागा लढवीत एक कोटी ३५ लाख ९७२ मते मिळवीत आपला मतांचा टक्का १९.३ टक्क्यांवर पोहोचविला.तर २००९ मध्ये राष्ट्रवादीच्या ११३ उमेदवारांना ७४ लाख २० हजार २१२ मते मिळाली होती व त्या पक्षाची मतांची टक्केवारी १६.३७ होती. यावेळी राष्ट्रवादीने सुमारे दुप्पट जागा लढविल्या व त्यांच्या मतांची संख्या वाढून ९१ लाख २२ हजार २९९ झाली आणि मतांचा टक्काही वाढून १७.२ एवढा झाला. स्वबळावर लढलेल्या काँग्रेसच्या बाबतीत मात्र उलटे घडले व आघाडी तुटण्याचा या पक्षास चांगलाच फटका बसला. २००९ मध्ये १७० मतदारसंघांतील काँग्रेस उमेदवारांना एकूण ९५ लाख २१ हजार ७०३ मतदारांनी पसंती दिली होती. त्यामुळे २१.०१ टक्के मते मिळवीत काँग्रेस सत्तेवर आली होती. आता मात्र काँग्रेसने आधीहून ११५ जागा जास्त लढवूनही त्यांची मते कमी होऊन ९४ लाख ९६ हजार १४४ एवढी झाली. मतांच्या टक्केवारीत मात्र तुलनेने मोठी म्हणजे सुमारे तीन टक्क्यांची घट झाली. असाच मोठा फटका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बसला. २००९ मध्ये या पक्षाच्या १४३ उमेदवारांना मिळून २५ लाख ८५ हजार ५९७ मते मिळाली होती व त्यांच्या मतांचा टक्का ५.७१ टक्के एवढा होता. यावेळी शंभर जागा जास्त लढवूनही मनसेच्या मतांना ओहोटी लागून फक्त १६ लाख ६५ हजार ०३३ एवढीच मते त्यांच्या झोळीत पडली. (विशेष प्रतिनिधी)
भाजपाचा टक्का झाला दुप्पट!
By admin | Updated: October 20, 2014 02:23 IST