Join us

घाटकोपर पश्चिमेत भाजपाचा प्रचार थंड

By admin | Updated: October 5, 2014 00:53 IST

घाटकोपर पश्चिम मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने प्रचाराला अजूनही सुरुवात न केल्याने कार्यकत्र्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

मुंबई : घाटकोपर पश्चिम मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने प्रचाराला अजूनही सुरुवात न केल्याने कार्यकत्र्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. येथे भाजपाने आमदार राम कदम यांना उमेदवारी दिली. काही दिवसांपूर्वीच कदम यांनी मनसेतून भाजपामध्ये उडी मारली होती. कदम यांच्यात अतिआत्मविश्वास निर्माण झाला की काय, अशी चर्चा आता मतदारांमध्येही सुरू झाली आहे.
युती-आघाडी तुटल्यानंतर पाच प्रमुख पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या. त्यात शिवसेनेकडून विभागप्रमुख सुधीर मोरे, मनसेकडून विभागाध्यक्ष दिलीप लांडे यांना तर भाजपातर्फे कदम यांच्या नावाचा सहभाग होता. यापैकी शिवसेनेचे मोरे आणि मनसेचे लांडे यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. ठरलेल्या रणनीतीनुसार दोन्ही उमेदवार घरोघरी पोहोचले आहेत. या मतदारसंघात कोणत्या अडचणी आहेत, आमदार म्हणून कदम यांनी काय करायला हवे होते आणि प्रत्यक्षात काय केले, हे जनतेला पटवून देत आहेत. गेल्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघात कदम यांनी आमदार म्हणून येथील जनतेसाठी एकही आश्वासक काम केलेले नाही. याउलट देवदर्शन, रक्षाबंधन असे दिखाऊ कार्यक्रम राबवले, त्याची जोरदार प्रसिद्धी केली आणि जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करत विरोधकांनी प्रचारात आघाडी घेतली. 
या परिस्थितीत मराठी मतदार बहुसंख्य असलेल्या या मतदारसंघात सेना, मनसेने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा उद्या येथे होत आहे.  (प्रतिनिधी)