नवी मुंबई : शहरातील एफएसआयचा प्रश्न भाजपा सरकारने सोडविला आहे. इतरांनी त्याचे श्रेय घेऊ नये. येणारी महापालिका निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार असल्याचे मत पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केले आहे. सीबीडीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये भंडारी यांनी निवडणुकीसह शहरातील समस्यांच्या संदर्भात माहिती दिली. नवी मुंबईमध्ये भाजपाची ताकद वाढली आहे. पालिकेची निवडणूक पक्ष स्वबळावर लढणार आहे. मंदा म्हात्रेच पक्षाचे नेतृत्व करतील असे संकेत त्यांनी यावेळी दिले. शहरातील एफएसआयचा प्रश्न भाजपा सरकारने सोडविला आहे. याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न काहीजण करत असल्याची टीकाही त्यांनी कोणाचेच नाव न घेता केली. औरंगाबादप्रमाणे नवी मुंबईतही सिडकोने जमीन फ्री होल्ड करावी यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. शहरातील सर्व प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. गणेश नाईक यांच्या भाजपा प्रवेशाविषयी त्यांनी थेट भाष्य टाळले. परंतु कोणालाही पक्षात प्रवेश देताना स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेतले जाईल असे स्पष्ट केले. आमदार मंदा म्हात्रे यांनी मिठागार कामगारांना भूखंड देण्याविषयी प्रक्रिया सुरू आहे. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या की हा प्रश्नही मार्गी लावला जाईल, असे स्पष्ट केले. यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष सी. व्ही. रेड्डी, विजय घाटे, भगवान ढाकणे व इतर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भाजपा स्वबळावर निवडणूक लढणार
By admin | Updated: February 15, 2015 00:24 IST