Join us  

नीरव मोदीला निवडणुकीपूर्वी आणतील, नंतर परत पाठवतील; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 4:11 PM

काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी नीरव मोदीच्या अटकेच्या वृत्तावर ही प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा चुना लावून परदेशात पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीला ब्रिटनमध्ये आज अटक करण्यात आली आहे. यावर राजकीय वर्तुळात धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून नीरव मोदीला भाजपा निवडणुकीसाठी भारतात आणेल आणि निवडणूक संपली की परत परदेशात पाठवेल अशी टीका केली आहे. 

काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी नीरव मोदीच्या अटकेच्या वृत्तावर ही प्रतिक्रिया दिली आहे. नीरव मोदीला परदेशात पळून जाण्यास भाजपानेच मदत केली होती. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदीला अटक करणे ही निवडणुकीत फायदा घेण्याचीच खेळी आहे. यामुळे निवडणुका झाल्यावर नीरव मोदीला पुन्हा परदेशात पाठवतील, असा आरोप त्यांनी केला आहे. 

नीरव मोदीविरुद्ध विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नीरव मोदीविरुद्ध दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेत विशेष प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी नीरव मोदीची पत्नी आमी मोदी हिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी होते. त्यानंतर, आता लंडनमधील न्यायालयानेही नीरव मोदीला अटक करण्याचे आदेश दिले होते. 

सीबीआयने इंटरपोल आणि ब्रिटिश प्रशासनाशी संपर्क करून फरार नीरव मोदीविरोधात लागू करण्यात आलेल्या रेड कॉर्नर नोटीसवर कारवाई करत अटक करण्याची मागणी केली होती. तपास यंत्रणेने जुलै- ऑगस्टमध्ये नीरव मोदीविरोधात ब्रिटनकडे प्रत्यार्पणाची अधिकृत मागणी केली होती.

टॅग्स :नीरव मोदीपंजाब नॅशनल बँक घोटाळा