Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा - बविआ एकत्र ?

By admin | Updated: February 12, 2015 23:00 IST

पालघर जिल्हापरिषदेतील सत्तेतून शिवसेनेला तडीपार करण्यासाठी भाजप आणि बविआ एकत्र येण्याची चिन्हे आहेत. बविआच्या मदतीने जिल्हापरिषदेत सत्ता

दीपक मोहिते, वसईपालघर जिल्हापरिषदेतील सत्तेतून शिवसेनेला तडीपार करण्यासाठी भाजप आणि बविआ एकत्र येण्याची चिन्हे आहेत. बविआच्या मदतीने जिल्हापरिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. एकुण ५७ जागांपैकी भाजपा २१, शिवसेना १५, तर बहुजन विकास आघाडी १० असे बलाबल असून भाजपा व आघाडीची युती होण्याची दाट शक्यता आहे. डहाणू पंचायत समितीमध्ये सत्तास्थापनेसाठी भाजपाला २ सदस्यांची गरज आहे. या ठिकाणीही बहुजन विकास आघाडीच्या ४ जागा असल्यामुळे येथेही भाजपा व आघाडी एकत्र येण्याचे प्रयत्न होत आहेत.राज्यस्तरावर सेना व भाजपामध्ये जोरदार जुंपली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हापरिषदेमध्ये सेना व भाजपा यांच्यात युती होण्याची शक्यता दिवसेंदिवस धूसर होत आहे. बहुजन विकास आघाडीची भाजपशी होत असलेली जवळीक लक्षात घेता बहुजन विकास आघाडी भाजप समवेत सत्तास्थापन करेल. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आ. हितेंद्र ठाकूर यांचे शिक्षणमंत्री विनोद तावडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले घनिष्ट संंबंध लक्षात घेता हे दोन्ही पक्ष एकत्र येतील असा अंदाज व्यक्त होत आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येताच बहुजन विकास आघाडीने भाजपा सरकारला पाठींबा जाहीर केला होता. दोन दिवसापुर्वी आ. हितेंद्र ठाकूर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका कार्यक्रमानिमित्त भिवंडी येथे एकाच व्यासपीठावर आले होते. जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याच्या भाजपच्या प्रयत्नाला सेनेने अक्षताच्या वाटाण्या लावल्या होत्या. सेनेने सर्वप्रथम बहिष्काराला विरोध केल्यामुळे पालकमंत्री विष्णू सवरा यांचे आवाहन हवेतच विरले होते. अशा सर्व पार्श्वभूमीवर जिल्हयातील भाजपाचे वरिष्ठ नेते सेनेबरोबर जवळीक साधण्याची शक्यता फार कमी आहे. डहाणू पंचायत समितीमध्ये भाजपाला सत्ता स्थापनेसाठी २ जागा कमी पडत आहेत. सेनेकडे २ जागा आहेत. येथे बहुजन विकास आघाडीकडे ४ जागा असून सत्ता स्थापनेसाठी त्यांची मदत घेण्याकडे भाजप नेत्यांचा कल आहे.