Join us  

पाऊले चालती भाजपची वाट..! तत्त्वांना तिलांजली, आता फक्त नंबर गेम..!

By अतुल कुलकर्णी | Published: July 28, 2019 1:29 AM

भाजपमध्ये या आणि स्वत:वरील सगळ्या आरोपांवर क्लीन चिट मिळवा, अशी आॅफर धडाक्यात चालू आहे.

- अतुल कुलकर्णी

मुंबई : कोणाला आपल्यावरील गुन्हे मागे घ्यायचे आहेत, कोणाला दाखल गुन्ह्यांची चौकशी होऊ द्यायची नाही, कोणाला साखर कारखान्याला, शिक्षण संस्थेला संरक्षण हवे आहे. कोणाला इन्कम टॅक्स व ईडीचा ससेमिरा चुकवायचा आहे. अनेकांना आपले ‘डबोले’ वाचवायचे म्हणून भाजपची वाट धरायची आहे. त्यामुळे ‘पाऊले चालती भाजपची वाट’ या न्यायाने सगळे निघाले आहेत. पक्षांतर लाटेचे हे खरे इंगित आहे. तत्त्व वगैरे ‘सब झूट’ आहे.

ज्यांनी भाजप वाढवला, त्यासाठी खस्ता खाल्ल्या अशा एका वर्गात या प्रकाराने ‘याचसाठी केला होता का अट्टाहास...’ अशी अस्वस्थता आहे. आमच्याकडे गाडीभर पुरावे आहेत, असे सांगत बैलगाडीतून पुरावे घेऊन मोर्चे काढणाऱ्या भाजपच्या त्या बैलगाड्या कुठे गेल्या माहिती नाही. पण ज्या राष्टÑवादीविरुद्ध त्यांनी रण पुकारले, त्यांच्यासोबत जाणार नाही असे ठासून सांगितले त्याच राष्टÑवादीचे अनेक नेते स्वत:ला पवित्र करून घेण्याच्या रांगेत आहेत. त्यांची रांग सगळ्यात मोठी आहे. भाजपमध्ये या आणि स्वत:वरील सगळ्या आरोपांवर क्लीन चिट मिळवा, अशी आॅफर धडाक्यात चालू आहे.

सुभेदारांचा किंवा निवडून येऊ शकणाऱ्यांचा पक्ष अशी ओळख असणाºया राष्टÑवादी काँग्रेसला लागलेली गळती धक्कादायक नाही. जमा झालेले सगळेच सत्तासाधू वृत्तीने एकत्र आले होते. त्यामुळे विचार, भूमिका यांच्याशी सोयरसुतक नसणारेच या पक्षात फक्त स्वत:ची सोय बघण्यासाठी आले. सोय संपली आणि त्यांनी सोयीचे दुसरे मार्ग निवडले. त्यांनी ज्या पक्षात जायचा निर्णय घेतला तो भाजप ‘आधी देश, नंतर पक्ष आणि शेवटी मी’ या घोषवाक्यावर विश्वास ठेवणारा. मात्र भाजपत जाणारे सगळे ‘आधी आणि शेवटी फक्त मीच’ या वृत्तीचे. कदाचित भाजपने आपले घोषवाक्य बदलले असावे..!

भाजपच्या मूळ निष्ठावंतांना फुटकळ पदे आणि बाहेरून आलेल्यांना पायघड्या असे चित्र उगाच तयार झालेले नाही. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांना मंत्रिमंडळात तिसºया क्रमांकाची खुर्ची मिळाली. अर्थसंकल्प सादर करण्यापुरते तरी आपल्याला तिसºया नंबरवर बसू द्या, अशी विनंती मुनगंटीवार यांना करावी लागली यातच सगळे काही आले. राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. ते म्हणाले, उद्या जर का तुमची सत्ता गेली तर हेच सगळे तुमचा पक्ष सोडून पळून जातील त्या वेळी तुमच्याकडे कोण राहील...? मात्र जर तर ला अर्थ नाही. जो तो आज काय या विचारात आहे.

भाजप आज लोकप्रियतेच्या चरमसीमेवर आहे. पक्षातल्या निष्ठावंतांना उभे करून ताकद देऊन त्यांना आमदार, खासदार करण्याची प्रचंड क्षमता त्यांच्याकडे आहे. बाहेरून भाजपमध्ये आलेल्यांसाठी जी ताकद खर्ची घातली जात आहे तीच जर का स्वपक्षातल्या निष्ठावंतांसाठी लावली तर... असा सवाल जुने जाणते करत आहेत. मात्र त्यापेक्षा जास्त ते काहीही करू शकत नाहीत हे वास्तव आहे. विरोधक संपवायचे तर विरोधकांनाच आपल्यात सामील करून घ्या म्हणजे ‘ना रहेगा बास, ना बजेगी बासरी’ असे धोरण यामागे आहे.एक किस्सा सांगितला जातो, तो खरा की खोटा यापेक्षा त्याचा मथितार्थ महत्त्वाचा. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना विरोधात फारसे कोणी नव्हतेच. तेव्हा नेहरू टोपण नावाने एका इंग्रजी दैनिकात सरकारच्या विरोधात पत्रे छापून आणायचे. त्यांना याचे कारण विचारले तेव्हा ‘विरोधी पक्ष जिवंत राहिला पाहिजे. तरच लोकशाही टिकेल आणि भारत हा लोकशाही जपणारा देश आहे हे जगाला कळायला हवे...’ असे उत्तर नेहरूंनी दिले होते. मात्र आता अशा तर्कांना फारसे महत्त्व उरलेले नाही.

म्हणूनच या गाण्याचे विंडबन खास आपल्यासाठी..!पाऊले चालती भाजपची वाट...!जुन्या संसाराची तोडूनिया गाठ...गांजुनिया भारी दु:ख दारिद्र्यानेपडता रिकामे सत्तेचे हे ताटपाऊले चालती पंढरीची वाटआप्त इष्ट सारे सगेसोयरे तेपाहुनिया सारे फिरविती पाठपाऊले चालती पंढरीची वाटघेता प्रसाद श्री सत्तेचा याअशा दारिद्य्राचा व्हावा नायनाटपाऊले चालती पंढरीची वाट...!

टॅग्स :भाजपा