Join us  

भाजपने अंधारात तीर मारत बसू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 1:39 AM

महापौर पद आणि शिवसेना पक्षाला बदनाम करण्याचा डाव भाजपने आखला आहे. लोकशाहीच्या नावाखाली बिनबुडाचे आरोप केले जात आहेत.

मुंबई : महापौर या पदाला वेगळीच प्रतिष्ठा आहे. मात्र विद्यमान महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून भाजपकडून भ्रष्टाचाराचा आरोप केला जात आहे. त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारीही भाजप नगरसेवकांनी केली. शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचे सतत प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसने उमेदवार उभा केल्यास समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेची अडचण वाढणार आहे. दुसरा मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या आव्हानाला शिवसेना पक्ष आणि महापौर स्वत: कशा सामोरे जाणार? याबाबत महापौर किशोरी पेडणकेर यांच्याशी केलेली ही बातचीत...तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, तुमचे स्पष्टीकरण काय?

महापौर पद आणि शिवसेना पक्षाला बदनाम करण्याचा डाव भाजपने आखला आहे. लोकशाहीच्या नावाखाली बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. ज्यांनी आरोप केले त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे. त्यांना स्पष्टीकरण देण्याची मला गरज वाटत नाही.

भाजपच्या आक्रमकतेचे आव्हान वाटते का?विरोधी पक्ष आक्रमक असावाच, यात काही दुमत नाही. पण आपला दबाव कायम ठेवण्यासाठी त्यांनी अंधारात तीर मारत बसू नये. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना आम्ही प्रत्यक्षात फिल्डवर जाऊन काम केले. यामुळे पोटशूळ उठलेल्यांनी राजकीय स्टंटबाजी सुरू केली आहे. पण जनतेला फार काळ मूर्ख बनवता येत नाही. त्यांना खरे काय ते माहीत असते आणि कोणी आरोप केले म्हणून आमचे काम थांबलेले नाही.एकीकडे भाजपचे आव्हान, तर दुसरीकडे काँग्रेसही समित्यांच्या निवडणुकांमध्ये उमेदवार उभे करणार आहे. अशा वेळी पक्षाची भूमिका काय?याबाबत पक्षप्रमुख निर्णय घेतील. अशी काही अडचण असल्यास पक्षातील वरिष्ठच प्रश्न सोडवतील.विविध समित्या, महासभेत भाजपकडून कोंडी केली जाण्याची शक्यता आहे. त्यांना कसे थोपवणार?त्यांनी गोंधळ घालून समित्या अथवा सभेच्या कामकाजात व्यत्यय आणल्यास आम्ही त्या गोंधळात काम रेटून नेऊ शकतो. प्रशासनाला सोबत घेऊन जनतेची विकासकामे करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. त्यामुळे त्यांनी गोंधळ घातल्यास त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार त्यांना प्रत्युत्तर दिले जाईल.

टॅग्स :भाजपाशिवसेना