Join us  

भाजप शिवसेनेत मालमत्ता कर माफी वरुन वाद उफाळला, भाजपमध्ये असलेल्या अंतर्गत वादातूनच पेंडसे यांची टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 3:25 PM

भाजप आणि शिवसेनेतील वाद आता आणखी उफाळला आहे. भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्यावर थेट आरोप करीत त्यांनाच मालमत्ता कर माफ करायचा नसल्याचे सांगितले आहे. परंतु दुसरीकडे पेंडसे यांना त्यांच्याच पक्षात विचारत नसल्याने आणि गटनेत्यांबरोबर असलेल्या वादामुळेच पक्षातील आपले स्थान निश्चित करण्यासाठी असे बिनबुडाचे आरोप केल्याचा दावा महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे.

ठाणे : काही दिवसांपूर्वी मनसे आणि शिवसेनेमध्ये वाद उफाळला होता. त्यानंतर आता कोरोना काळातील मालमत्ता कर माफ करावा या मागणीवरुन आता भाजप विरुध्द शिवसेना असा वाद सुरु झाला आहे. शिवसेनेने २५ वर्षात ठाणेकरांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप भाजपच्या नगरसेविकेने केला आहे. परंतु दुसरीकडे या निमित्ताने पुन्हा एकदा भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा दिसून आली आहे. वास्तविक पाहता या संदर्भात भाजपचे गटनेते किंवा शहर अध्यक्ष यांनी टिका करणे अपेक्षित होते. परंतु केवळ गटनेते संजय वाघुले यांच्याबरोबर असलेल्या वादामुळेच त्यांनी ही टिका केल्याचा आरोप आता शिवसेनेकडून झाला आहे. त्यामुळे शिवसेना, भाजप मधील वादाला आता हे वेगळेच वळण लागल्याचे दिसत आहे.           दोन दिवसापूर्वी झालेल्या महासभेत तीन महिन्यांची मालमत्ता कर माफी द्यावी अशी आग्रही मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली होती. परंतु यावरुन महासभेत चांगलाच गदारोळ झाला होता. भाजपने सत्ताधाऱ्यांवर टिकेची झोड उठविली होती. त्यानंतर शिवसेनेने देखील भाजप वाल्याने कुठे कुठे सवलती दिल्या आहेत, असा सवाल केला होता. त्यामुळे सभागृहात चांगलाच वादंग निर्माण झाला होता. त्यानंतर भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे थेट महापौर नरेश म्हस्के यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडत २५ वर्षे सत्ता उपभोगूनही ठाणेकरांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप केला आहे. गोंधळात झालेल्या महासभेत म्हस्के यांनी मालमत्ता कर बाबत टोलवाटोलवी केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यानंतर आता महापौर नरेश म्हस्के यांनी थेट पेंडसे यांच्यावर गटबाजीचा आरोप केला आहे. त्यांच्याच पक्षाचे गटनेते संजय वाघुले यांच्यासोबत असलेल्या वादामुळेच आणि पक्षात कोणीही विचारत नसल्याने आणि वाघुले यांना कमीपणा दाखविण्यासाठीच त्यांनी अशी टिका केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महापालिकेचे उत्पन्न घटलेले आहे, शहराच्या विकासाची कामे शिल्लक आहेत. त्यामुळे मालमत्ता कर माफ करणे हा उपाय होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. संजय वाघुले यांच्या सोबत त्यांचा वाद आहे, त्यामुळे आपले पक्षातील स्थान वाढविण्यासाठी आणि भविष्यात पालिकेत मानाचे पद मिळविण्यासाठीच अशा प्रकारे टिका करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाल्याचेही त्यांनी सांगितले. एकूणच आता शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या वादाला म्हस्के यांनी केलेल्या विधानामुळे वेगळे वळण लागले असून भाजपमध्ये आता खरच अंतर्गत वाद आहेत, तो गटात भाजप विखुरली गेली आहे का? याची चर्चा आता सुरु झाली आहे. 

टॅग्स :ठाणेठाणे महापालिकाभाजपा