Join us  

नामकरणावरून भाजप-सेना आमनेसामने, महापौरांनी दिलं चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 10:31 AM

हिंमत असेल तर मैदानात या : महापौर; या तर कोलांटउड्या -भाजप

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मालवणी मालाडमधील मैदानाला टिपू सुलतान क्रीडांगण असे नाव देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय महापालिकेकडून  झालेला नाही. मात्र  भाजपने त्यावरून मुंबईला अस्थिर करण्याचा  प्रयत्न चालविला आहे. हिंमत असेल तर त्यांनी थेटपणे मैदानात येऊन लढावे, असे आव्हान महापौरकिशोरी पेडणेकर यांनी  केले.

महापौर म्हणाल्या, भाजपाचे माजी आमदार राज पुरोहित यांनी दंगल घडविण्याचा इशारा दिला आहे, त्यांनी तसा प्रयत्न करू देच, त्यांना मुंबईकर दाखवून देतील. गेल्या दोन वर्षांपासून  राज्यात सुरू असलेली विकास कामे  त्यांना बघवत नाहीत, त्यामुळे भाजपला पोटसूळ उठले आहे. निवडणूक संपल्यानंतर त्यांना त्याचे उत्तर मिळेल.’दरम्यान, दोन दिवसांपूर्वी या उद्यानास ‘राणी लक्ष्मीबाई उद्यान’ नाव देण्याची मागणी करणाऱ्या महापौर आता कोलांटउडी घेत टिपू सुलतानचे समर्थन  करत आहेत, असा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला. टिपू सुलतान हे नामकरण अनधिकृत असून याला महापौरांचा पाठिंबा आहे काय हे स्पष्ट करावे. यापूर्वी  शहरात दोन रस्त्यांना ‘टिपू सुलतान’ असे नाव देण्यात आले आहे. त्या सभावृत्तांतातील खाडाखोडीचाअर्थ काय? असा प्रश्न करतानाच भाजप आजही टिपू सुलतानचे नाव दिलेल्या दोन्ही रस्त्यांच्या नामकरणाच्या ठरावाच्या फेरविचाराच्या मागणीवर भाजप ठाम असल्याचे ते म्हणाले.

तेव्हा फडणवीस यांनी आक्षेप का घेतला नाही?२८ ऑगस्ट २०१५ मध्ये अस्लम शेख यांच्या आमदार निधीमधून या मैदानाचे बांधकाम झाले. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर तत्कालिन अल्पसंख्याक विकासमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलेल्या उत्तरामध्ये वीर टिपू सुलतान क्रीडांगण असा उल्लेख आहे, त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांना त्यावेळी का आक्षेप घेतला नाही, असा प्रश्न पेडणेकर यांनी उपस्थित केला.

टॅग्स :मुंबईमहापौरकिशोरी पेडणेकर