Join us
Daily Top 2Weekly Top 5

चेंबूरमध्ये भाजपा-रिपाइं आमने-सामने

By admin | Updated: February 16, 2017 02:27 IST

सेना-भाजपाची पालिका निवडणुकीसाठी युती तुटलेली असली, तरी भाजपासोबत अनेक मित्रपक्ष पालिका निवडणूक एकत्र लढत आहेत.

मुंबई : सेना-भाजपाची पालिका निवडणुकीसाठी युती तुटलेली असली, तरी भाजपासोबत अनेक मित्रपक्ष पालिका निवडणूक एकत्र लढत आहेत. यासाठी भाजपाने काही जागा मित्रपक्षांसाठी सोडलेल्या आहे. एम पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक १५२ हा प्रभागदेखील भाजपाने रिपाइंसाठी सोडला होता. मात्र, अचानक भाजपानेदेखील या प्रभागातून उमेदवार उभा केल्याने, सध्या या ठिकाणी भाजपा-रिपाइंमध्ये फूट पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे चेंबूरमध्ये भाजपा-रिपाइंची युती तुटल्याची चर्चा होत आहे. पालिकेचा एम पश्चिम वॉर्डदेखील प्रभाग क्रमांक १५२मध्ये असल्याने, हा प्रभाग चेंबूरसाठी महत्त्वाचा आहे. ६० टक्के झोपडपट्टी तर ४० टक्के उच्चभ्रू लोकवस्ती या परिसरात आहे. यामध्ये सुभाषनगर, चेंबूर रेल्वे स्थानक परिसर, चेंबूर नाका, पोस्टल कॉलनी या लोकवस्त्यांचा समावेश आहे, तर सिद्धार्थ कॉलनी हा सर्वांत मोठा झोपडपट्टी परिसरही या प्रभागात आहे. या प्रभागामधून एकूण १७ उमेदवार रिंगणात आहेत. यातील १२ ते १४ उमेदवार हे एकट्या सिद्धार्थ कॉलनीतीलच रहिवाशी असून, या परिसरात दलित मते निर्णायक आहेत. त्यातच या वेळेस पहिल्यांदाच हा प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने, उमेदवार भवितव्य आजमावत आहेत. ऐन वेळी दोन्ही पक्षांकडून इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यानंतर, भाजपाने उमेदवारी मागे घेण्याची मागणी रिपाइंनी केली. मात्र, नकार देत, प्रचाराला सुरुवात केली. त्यामुळे दोन्ही उमेदवार सध्या प्रचार करत आहेत. (प्रतिनिधी)