मुंबई: राजकीय पक्षांचे बेकायदेशीर होर्डिंग लावण्यात आले, तर त्याला जबाबदार कोण? अशी विचारणा गेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने राजकीय पक्षांकडे केली होती. त्यावर भाजपने ही जबाबदारी प्रभाग अध्यक्षावर तर राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा अध्यक्षांवर निश्चित केल्याची माहिती सोमवारी उच्च न्यायालयाला दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) अद्याप यावर स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.बेकायदेशीर होर्डिंग प्रकरणी मुंबईच्या ‘जनहित मंच’ व सातारा येथील ‘सुस्वराज्य फाउंडेशन’ या दोन एनजीओंनी उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे केली आहे. गेल्या सुनावणी वेळी खंडपीठाने महापालिकांच्या हद्दीत लावण्यात येणारी होर्डिंगची पाहणी करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांसह राजकीय पक्षाच्या नेत्यांची नियुक्ती करणार का? अशी विचारणा केली होती. त्यावर भाजपने, महापालिकेच्या हद्दीत बेकायदेशीर होर्डिंग लावण्यात आले, तर त्यास प्रभाग अध्यक्ष जबाबदार असतील व प्रभाग अध्यक्षच बेकायदेशीर होर्डिंगची माहिती महापालिकेला देतील, असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसने ही जबाबदारी जिल्हा अध्यक्षांवर सोपवली आहे. त्यावर खंडपीठाने याबाबतचे आदेश २६ नोव्हेंबर रोजी देणार असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
भाजपा, राष्ट्रवादीने केली जबाबदारी निश्चित
By admin | Updated: November 25, 2015 03:09 IST