Join us  

भाजपा खासदार गोपाळ शेट्टी राजीनामा देण्याच्या पवित्र्यात, ख्रिश्चनांबाबत वादग्रस्त वक्तव्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 6:03 AM

स्वातंत्र्यलढ्यात ख्रिश्चनांचे योगदान नव्हते, असे वक्तव्य करणारे उत्तर मुंबईतील खासदार गोपाळ शेट्टी यांना भाजपा नेतृत्वाने शुक्रवारी जाब विचारताच, त्यांनी राजीनाम्याचा पवित्रा घेतल्याने भाजपाची अडचण झाली.

मुंबई : स्वातंत्र्यलढ्यात ख्रिश्चनांचे योगदान नव्हते, असे वक्तव्य करणारे उत्तर मुंबईतील खासदार गोपाळ शेट्टी यांना भाजपा नेतृत्वाने शुक्रवारी जाब विचारताच, त्यांनी राजीनाम्याचा पवित्रा घेतल्याने भाजपाची अडचण झाली. पदापेक्षा मला भाषणस्वातंत्र्य महत्त्वाचे वाटते, अशी भूमिका त्यांनी घेतली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांची समजूत काढली.ख्रिश्चन समाजाबद्दल मी केलेल्या विधानाचा विपर्यास केला गेला. त्या समाजाच्या भावना दुखाविण्याचा माझा उद्देश नव्हता. हे सर्व काँग्रेसचे षड्यंत्र आहे, असे शेट्टी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मी ख्रिस्ती समाजातील व्यक्तींशी चर्चेस तयार असल्याचे ते म्हणाले. मी मालवणीत मुस्लिमांच्या दफनभूमीसाठी पाच एकर जागा मिळवून दिली. त्या कार्यक्रमात, हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यात ना एकट्या हिंदू वा एकट्या मुस्लीम समाजाचे योगदान नव्हे, तर संपूर्ण हिंदुस्थानी नागरिकांचे योगदान होते, असे वक्तव्य मौलवींनी केले होते. त्यांच्या भाषणाचा धागा पकडून मी वक्तव्य केले, पण त्याचा विपर्यास केला गेला, असे खा. गोपाळ शेट्टी म्हणाले. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.माझ्या भूमिकेमुळे पक्ष अडचणीत येणार असेल, तर पदापेक्षा मला भाषणस्वातंत्र्य महत्त्वाचे वाटते. ही लढाई मला एकट्याला लढायची असल्याने मी खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, राजीनामा देऊन ही लढाई तुम्ही एकट्याने लढू नका, असा दिलासा पक्ष नेतृत्वाने मला दिला.- गोपाळ शेट्टी, खासदार

टॅग्स :गोपाळ शेट्टी