मुंबई : भाजपा आमदार सरदार तारासिंग यांना एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकीचे पत्र पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी अॅण्टॉप हील पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तारासिंग यांचे सायन कोळीवाडा येथे कार्यालय आहे. त्यांच्या कार्यालयात आलेल्या पत्राने एकच गोंधळ उडाला. या पत्रात, ’जान प्यारी हे तो एक करोड रुपये लेके नरिमन पॉईंट पे आ जाना..’ अशा आशयाचा मजकूर आहे. कार्यालयातील भारती अय्यर यांनी याबाबत तारासिंग यांना कळविले. त्यांच्या सांगण्यावरुन अॅण्टॉप हील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.या खंडणीचे पत्राबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. याबाबत सरदार तारासिंग यांच्याकडे विचारणा केली असता, मी एक गरीब आमदार असून ज्याने कोणी हे पत्र लिहिले त्याने मलाच पैसे आणून दिले तर बरे होईल, असे सांगितले. पत्र पाठविणाऱ्याचा पोलीस शोध घेत असल्याचेही तारासिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र या पत्रामुळे राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)
भाजपा आमदाराला खंडणीची धमकी
By admin | Updated: September 30, 2016 03:43 IST