Join us
Daily Top 2Weekly Top 5

मानखुर्दमध्ये भाजपा, रिपाइंची खेळी कोणासाठी?

By admin | Updated: October 1, 2014 01:18 IST

पक्षांनी वेळेवर एबी फॉर्म न दिल्याने मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे 2 आणि रिपाइंचा एक अशा तीन उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.

मुंबई : पक्षांनी वेळेवर एबी फॉर्म न दिल्याने मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे 2 आणि रिपाइंचा एक अशा तीन उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे मानखुर्द-शिवाजी नगरमध्ये भाजपा आणि रिपाइंचा एकही अधिकृत उमेदवार रिंगणात नाही. आता ऐनवेळी भाजपा कोणाला पाठिंबा देणार हे पाहणो महत्त्वाचे आहे. 
महायुतीच्या घटस्फोटापूर्वी मानखुर्द-शिवाजी नगरची जागा शिवसेनेला दिली जाणार होती. मात्र, सेना आणि भाजपाची युती तुटली आणि भाजपासह रिपाइंनेदेखील येथे अर्ज दाखल केले. त्यानंतरही रिपाइंने मानखुर्दसाठी आग्रह कायम ठेवला होता. रिपाइंने रमेश कांबळे यांना अर्ज दाखल करण्यास सांगितला होता. तसेच भाजपाकडून परमेश्वर कांबळे आणि  शमीम बानो यांनी अर्ज दाखल केले होते. दोन्ही पक्षांमध्ये शेवटर्पयत काहीही स्पष्टता नव्हती. त्यात अर्ज छाननीमध्ये तिघांचेही अर्ज बाद ठरले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून येथे कोणीही अधिकृत उमेदवार नाही. भाजपाचे परमेश्वर कांबळे यांनी भाजपासह अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज स्वीकृत झाला आहे. त्यामुळे आधी भाजपकडून अर्ज दाखल केलेले कांबळे आता अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असतील. 
रिपाइं आणि भाजपाची संवादाअभावी झालेली चूक आहे की, कोणत्या उमेदवाराला फायदा पोहोचवण्यासाठीची रणनीती आहे, हे पाहणो महत्त्वाचे आहे. भाजपा किंवा त्यांच्या मित्रपक्षांकडून कोणीही अधिकृत उमेदवार नसल्याचा फायदा शिवसेनेला होणार असल्याचे सध्या तरी दिसते. समाजवादी पार्टीचे सध्याचे आमदार अबू आझमी यांच्यासमोरची डोकेदुखी मात्र वाढली आहे. शिवसेनेमधून या ठिकाणी सुरेश (बुलेट) पाटील हे उमेदवार आहेत. सध्या सपा, शिवसेनेसह काँग्रेसचे युसूफ अब्राहनी, राष्ट्रवादीचे राजेंद्र वाघमारे, शेकापचे रणजीत वर्मा हेदेखील रिंगणात आहेत. या मतदारसंघातून एकूण 29 जणांनी अर्ज दाखल केले होते. यामधून सात अर्ज बाद झाले असून सध्या या मतदारसंघातून 22 उमेदवार रिंगणात आहेत. आता अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अजून काही घडमोडी होतात, का हे पाहणोही महत्त्वाचे आहे. (प्रतिनिधी)