Join us  

भाजपाच्या नेत्यांचे शिवसेनेकडून वस्त्रहरण; मंत्री, आमदार, खासदारांच्या घोटाळ्यांची काढली पुस्तिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 3:34 AM

भाजपाविरोधाची धार अधिक तीव्र करताना शिवसेनेने आज भाजपाचे राज्यातील मंत्री, आमदार, खासदारांच्या कथित घोटाळ्यांची पुस्तिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाचे नेते आणि राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत वितरित केली.

मुंबई : भाजपाविरोधाची धार अधिक तीव्र करताना शिवसेनेने आज भाजपाचे राज्यातील मंत्री, आमदार, खासदारांच्या कथित घोटाळ्यांची पुस्तिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाचे नेते आणि राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत वितरित केली. हे घोटाळे जनतेसमोर नेण्याचे जणू आदेशच त्यांनी दिले. तसेच विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा, असा आदेश दिला.सेनाभवनात झालेल्या या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि राज्य सरकारवरही तोफ डागली.शिवसेनेला चिरडण्यास निघालेल्यांना जागा दाखवून देऊ, असे ते म्हणाले. सरकार चुकत असेल तिथे आम्ही बोलूच आमचा आवाज कोणीही दाबू शकत नाही, असेही त्यांनी ठणकावले.राज्य सरकारची कर्जमाफी फोल ठरली आहे. ३४ हजार कोटीरुपयांच्या कर्जमाफीचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात हा आकडा८-१० हजार कोटींवर जाणार नाही, असे ते म्हणाले.यापुढच्या निवडणुका आपल्याला स्वबळावरच लढाव्या लागतील. काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणे भाजपाचाही सारख्याच ताकदीने मुकाबला करा, असे उद्वव यांनी सांगितले.शिवसेना देणार २ कोटी रुपयेशिवसेनेच्या वतीने शेतकºयांना मदत म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २ कोटी रुपये सुपूर्द करण्यात येणार आहेत. स्वत: उद्धव त्यात १० लाख रुपये देणार आहेत. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आपला वाटा देतील.हे भाजपा नेते रडारवर : शिवसेनेने काढलेल्या पुस्तिकेत पहिल्या पानावर गिरीश बापट (तूरडाळ घोटाळा), एकनाथ खडसे (जमीन घोटाळा), विनोद तावडे (राष्ट्रीय नेते फोटो घोटाळा) आणि खा.दिलिप गांधी (कर्ज घोटाळा) यांचे फोटो आहेत. या शिवाय, चंद्रशेखर बावनकुळे (सोलार घोटाळा), विष्णू सावरा (आदिवासी योजना घोटाळा), रणजित पाटील (जमीन घोटाळा), जयकुमार रावल, संभाजी पाटील निलंगेकर, नरेंद्र मेहता (आर्थिक घोटाळा) आदींचेही फोटो आतील पानांत आहेत. नागपूरसह राज्यात गुन्हेगारी वाढल्याचे नमूद करीत मुख्यमंत्र्यांच्या गृह खात्यावर तोफ डागण्यात आली आहे.‘सामना’तील मते माझीचसामना या शिवसेनेच्या मुखपत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली जाते. सामनात व्यक्त होणारी मते ही संजय राऊत यांची नव्हे तर माझीच असतात असे सांगत उद्धव यांनी भाजपाला आव्हान दिले.शिवसेनेचे सर्व नेते, मंत्री आजच्या बैठकीला हजर होते. मात्र, खा.अनिल देसाई यांनी प्रास्ताविक केल्यानंतर उद्धव यांच्या व्यतिरिक्त केवळ खा.संजय राऊत यांचेच भाषण झाले.

टॅग्स :भाजपाशिवसेना