Join us  

"...राहुल गांधी शाळेतील वाईटातले वाईट विद्यार्थी, काँग्रेस नेते एकाच कुटुंबामागे कधीपर्यंत धावणार?"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 1:00 PM

ओबामांच्या लिखानावरून राहुल गांधी भाजपच्या निशाण्यावर...

मुंबई - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या 'अ प्रॉमिस्ड लँड' या पुस्तकात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासंदर्भात उल्लेख केला आहे. हाच धागा धरत, आता भाजप नेते राम कदम यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. बराक ओबामा यांनी राहुल गांधी यांना अप्रत्यक्षपणे शाळेतील वाईटातला वाईट विद्यार्थी (बद  से बदतर) आहे, असे म्हटले आहे. यामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते गांधारी प्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून एक कुटुंबामागे कधीपर्यंत धावणार? असा सवाल राम कदम यांनी केला आहे.

राम कदम यांनी एक ट्विट करत म्हटले आहे, "बराक ओबामा यांनी अप्रत्यक्षपणे म्हटले आहे, की राहुल गांधी हे शाळेतील वाईटातले वाईट विद्यार्थी आहेत. शिवसेना त्यांना तेजस्वी हिरो आणि राहुल झिरो, असे अप्रत्यक्षपणे म्हणते. कॉंग्रेस नेते गप्प, प्रश्न असा आहे, काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते गांधारी प्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून एक कुटुंबामागे कधीपर्यंत धावणार? एवढेच नाही, तर देशात विचारले, की पप्पू केण आहे? तर एका विशिष्ट व्यक्तीचे नाव समोर येते, असेही राम माधव यांनी म्हटले आहे."

ओबामा यांनी नेमके काय लिहिले आहे? - ओबामा यांच्या या पुस्तकाची चर्चा आता भारतातही सुरू आहे. बराक ओबामा यांनी आपल्या नव्या पुस्तकात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि केरळमधील वायनाड येथील खासदार राहुल गांधी यांच्याबाबत उल्लेख करतान म्हटले आहे, की राहुल गांधी हे एक नर्व्हस आणि अपरिपक्व व्यक्ती आहेत. एखादा विद्यार्थी जसा आपल्या अभ्यास करून शिक्षकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याच्यामध्ये त्या विषयात प्राविण्य मिळवण्याची पात्रता नसते किंवा त्या विषयाबाबत आवडीचा अभाव असतो, तसं त्यांच्याबाबत घडत आहे.