मुंबई : युती राहो किंवा तुटो, आमदार राम कदम यांच्या एन्ट्रीने येत्या विधानसभा निवडणुकीत घाटकोपर पश्चिम मतदारसंघात भाजपालाच फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारसंघांची पुनर्रचना झाली. त्यात घाटकोपर आणि कुर्ला मतदारसंघांतले काही भाग जोडून घाटकोपर पश्चिम हा नवा मतदारसंघ तयार झाला. पूर्वीपासून या मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व होते. याही लढतीत शिवसैनिकांनी घाटकोपर पश्चिमसाठी आग्रह धरला होता. कदम भाजपामध्ये येण्याआधी त्यांच्यासह विभाग अध्यक्ष दिलीप लांडे, गणोश चुग्गल ही नावे मनसेतून चर्चेत होती. शिवसेनेतून विभागप्रमुख सुधीर मोरे यांचे नाव पुढे येत होते तर भाजपाकडून महामंत्री विनायक कामत, प्रवक्ते अवधूत वाघ या नावांवर विचार सुरू होता.
पक्षप्रवेशानंतर कदम हे भाजपाचे संभाव्य उमेदवार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपा पदाधिका:यांमध्ये असंतोष आहे. निवडणुकीत या पदाधिका:यांकडून कदमांना सहकार्य मिळणार नाही. मात्र भाजपापेक्षा येथील शिवसैनिक या निर्णयामुळे जास्त संतप्त आणि अस्वस्थ आहेत. कदम यांना उमेदवारी मिळाल्यास येथील शिवसैनिकांकडून स्वतंत्र उमेदवार उभा केला जाऊ शकतो. या उमेदवाराला नाराज भाजपा कार्यकत्र्यासह मनसेतील कदम यांच्या विरोधकांचा पाठिंबा मिळू शकतो; किंवा स्थानिक शिवसैनिक सर्व ताकदीनिशी कदम यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारामागे उभे ठाकू शकतात.
निवडणुकीच्या प्रचारात पाच वर्षामध्ये कदम यांनी केलेली कामे हाच विरोधकांचा प्रमुख मुद्दा असेल. देवदर्शन, अध्यात्म या माध्यमातून कदम यांनी घाटकोपरमध्ये जनाधार निर्माण केला. मात्र हे करताना त्यांनी पक्षाला दूर ठेवत स्वत:चा ब्राण्ड निर्माण केला, असा आरोप मनसेतूनच होतो. त्यामुळे येत्या निवडणुकीच्या प्रचारात कदम यांनी गेल्या पाच वर्षामध्ये जनतेसाठी केलेल्या कामांचा हिशोब हाच विरोधकांचा प्रमुख मुद्दा असेल. (प्रतिनिधी)
1कदम यांच्या भाजपाप्रवेशामुळे मनसेच्या लांडेंची उमेदवारी जवळपास निश्चित, अशी चर्चा आहे. मात्र लांडे हे या मतदारसंघासाठी उपरे आहेत. त्यांनाही पक्षांतर्गत विरोधक आहेत. तसेच मनसेची उमेदवारी मिळाल्यास नाराज शिवसैनिक, भाजपा कार्यकत्र्याची मदत लांडेंना मिळणार नाही.
2चुग्गल स्थानिक असून, मनसेतील कदम यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी मानले जातात. त्यांना शिवसेना, भाजपामधून कदमांशी दोन हात करण्यासाठी सहकार्य मिळू शकते. त्यामुळे लांडेंऐवजी चुग्गल कदम यांचा सामना करू शकतात, असेही बोलले जाते. एकूणच येथे कदम यांच्याविरोधात सर्व पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे.