Join us

भाजपा सरकार कामगारविरोधी !

By admin | Updated: April 17, 2015 22:50 IST

सर्वसामान्यांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणारे राज्यातील शिवसेना-भाजपा सरकार हे कामगार विरोधी आहे.

नवी मुंबई : सर्वसामान्यांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणारे राज्यातील शिवसेना-भाजपा सरकार हे कामगार विरोधी आहे. या सरकारने उद्योगपतींच्या हितासाठी ‘मेक इन महाराष्ट्र’ आणि ‘मेड इन महाराष्ट्र’ची संकल्पना राबविण्यासाठी तब्बल १३ कामगार कायद्यांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे माथाडी कामगारांसह राज्यातील सर्वच कामगार देशोधडीला लागणार असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तुर्भे येथे गुरुवारी केला.सामंत विद्यालयाच्या प्रांगणात तुर्भे परिसरातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. केशरी कार्डधारकांचे १५ किलो धान्य बंद करून या सरकारने गरीबांचा घास हिसकावल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी दिवंगत डी. आर. पाटील, भोलानाथ पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांसह माथाडींसाठी केलेल्या कामाचा आढावा घेऊन त्यांचा वारसा चालविण्यासाठी पाटील कुटुंबातील सदस्यांना निवडून देण्याचे आवाहन केले. तसेच राष्ट्रवादीने नवी मुंबई महापालिकेत केलेल्या विकासकामांची जंत्री सादर करून शहर विकासासाठी राष्ट्रवादीस निवडून देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील यांचीही भाषणे झाली. यावेळी माथाडी नेते व आमदार शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, एपीएमसीचे संचालक चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे उमेदवार निशांत पाटील, विवेक पाटील, शुभांगी पाटील, शशिकला पाटील उपस्थित होते. (खास प्रतिनिधी)राज्यात अथवा केंद्रात सरकार कोणत्याही पक्षाचे असो, ते राष्ट्रवादीचे संस्थापक, अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या सल्ल्याने वागत असल्याचा दावा सुनील तटकरे यांनी केला. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या बारामती दौऱ्यातील भाषणाचा संदर्भ दिला. त्यामुळे कामगार कायद्यात बदल केला, तर पवार तो पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्र्यांना भेटून हाणून पाडतील, असे ते म्हणाले.